कणकवली (प्रतिनिधी) : भारताचे संविधान स्वीकारल्यानंतर 2025 हे वर्ष अमृत महोत्सवी म्हणजे प्लॅटिनम वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या 75 वर्षात संविधानाने लोकशाही समाज रचनेची व्यापक कल्पना प्रत्यक्षात अमलात आणून नागरिकांना सत्तेचा केंद्रबिंदू केले आहे. समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या सर्वोच्च मूल्यातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार विकासाची संधी प्राप्त करून देणारी गणराज्य संस्कृती भारताच्या संविधान सभेने आपणाला अमूल्य भेटच दिली आहे .त्यातून इथला नागरिक लोकांमधून लोकप्रतिनिधी निवडून लोकांमधूनच निवडलेले सरकार बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये गतिमान झाला आहे. पण अजूनही त्याचा रुबाब आणि डोळ्यातील चमक ही स्वयंशासकाची नसल्याने संविधानाला अभिप्रेत लोककल्याणकारी सरकार आपणाला निर्माण करता आलं नाही. लोकशाही समाज रचनेमध्ये दररोजचा व्यवहार करताना नागरिक म्हणून आपण सर्व गोष्टी समाज जीवनामध्ये लाभ म्हणून घेतो. मग नागरिक म्हणून जाती धर्माची ओळख का पांघरली जाते?कायमच प्रथम भारतीय आणि अंतिमता भारतीय हीच ओळख राष्ट्र निर्मितीसाठी बनवून का राहत नाही? असा प्रश्न उपस्थित करत भारतीय लोकशाही समाज महासंघाच्या वतीने आयोजित 75 वर्षांत संविधानाने आम्हाला काय दिले? आणि संविधानिक नीतिमत्ता वाढवण्यासाठी आम्ही नागरिकांनी काय केले? या परिसंवादाच्या मार्गदर्शना प्रसंगी एडवोकेट रावसाहेब मोहन यांनी नागरिकांची जबाबदारी कर्तव्य यावर संबोधन करत प्रकाश टाकला. मताधिकाराच्या माध्यमातून योग्य आणि लायक प्रतिनिधी निवडून संविधानाने दिलेला अमूल्य अधिकाराचे पालन जेव्हा समाज जीवनामध्ये इथला नागरिक अमलात आणताना दिसेल तेव्हा संविधानाला अभिप्रेत लोककल्याणकारी राज्याची निर्मिती होईल. याला सर्वस्वी जबाबदार नागरिक म्हणून आपणच आहोत आणि येणाऱ्या कालावधीत आपणाला सर्व नागरिकांमध्ये ही जागरूकता निर्माण करून संविधानिक नीतीमत्ते चे पालन केले पाहिजे असे संबोधन याप्रसंगी त्यांनी केले.
एडवोकेट मनोज रावराणे यांनी या विषयावर भाष्य करताना भारताच्या अखंडतेचे महत्त्व सांगत वेगवेगळे प्रदेश संस्कृती भाषा भूरचना यातून विभागलेला संपूर्ण प्रदेश भारत देश म्हणून आकाराला आला आणि 75 वर्षात कोणतेही तुकडे न होता अखंड टिकला. याला फक्त आणि फक्त भारताचे संविधान कारणीभूत आहे. नव्या जगात प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा विभागणी होऊन त्यांचे वेगवेगळे देश आणि वेगवेगळे तुकडे झाले. पण भारताच्या अखंडतेचे हे सौंदर्य केवळ संविधानाच्या निर्मितीमध्ये आहे ही आपल्या भारतीयांसाठी गौरवाची गोष्ट आहे असे उद्गार काढले.
येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय लोकशाही समाज मजबूत करण्याच्या उद्देशाने संविधानाला अभिप्रेत लोक कल्याणकारी राज्य बनविण्याचे ध्येय आपण उराशी बाळगले पाहिजे. त्यासाठी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली मी प्रथम भारतीय आणि अंततः भारतीयच हीच ओळख समाज जीवनात रुजली गेली पाहिजे. असे मार्गदर्शन यावेळी ॲडव्होकेट रावसाहेब मोहन यांनी केले. या कार्यक्रमाला खास गाजियाबाद येथून रामेश्वर दयाल हे उपस्थित राहिले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राष्ट्रीय सहसंयोजक सूर्यकांत कदम यांनी भूषविले तर सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.













