जिल्ह्यातील नागरिकांनी मिनी सरस प्रदर्शनाला भेट द्यावी
6 ते 10 जानेवारी दरम्यान कागलकर हाऊसमध्ये प्रदर्शन सुरु
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. मुंबईतील महालक्ष्मी तसेच येथील मिनी सरस अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना यशस्वी उद्योजिका म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी देण्यात येत आहे. महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी बचत गटांची प्रदर्शने महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय कोल्हापूर मिनी सरस प्रदर्शन 6 ते 10 जानेवारी 2025 या दरम्यान कागलकर हाऊस, जुनी इमारत, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील लाखो महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने मिनी सरस सारखी प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. सर्वच क्षेत्रात महिलांना संधी मिळवून दिल्यास त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच त्यांच्यासह राज्य आणि देशाचाही विकास होत असल्याचे अनेक देशांमध्ये दिसून येते. बचत गटातील महिलांना सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळेच उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका बनून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतील. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ तसेच जिल्ह्यातील सर्व भागातील पदार्थांची चव चाखण्याची संधी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना मिळणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात सुषमा देसाई म्हणाल्या, जिल्ह्यात 27 हजार 300 स्वयंसहायता समुह आहेत. या सहा महिन्यात उमेद अभियानातील 57 हजार महिलांचे उत्पन्न 1 लाखावर गेले आहे. जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी आणि ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिनी सरस प्रदर्शन उभारण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील वैविध्यपूर्ण चवींचे खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होत असल्याने या प्रदर्शनाच्या निमित्ताने मेजवानी मिळणार आहे. राज्य स्तरावरील महालक्ष्मी प्रदर्शनात नेहमी सहभागी होत असलेले सर्व प्रकारचे स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. यामुळे महिलांच्या उत्पादनांना राज्यातील इतर मोठ्या शहरात मागणी व प्रसिद्धी मिळेल. या प्रदर्शनात खाद्य पदार्थ, मसाले, कलाकुसरीच्या वस्तू, कोल्हापूरी साजसह इमिटेशन ज्वेलरी तसेच तांदूळ, काजू, लोणची, पापड, चटण्या, मिलेटपासून बनवण्यात आलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.आभार मनिषा देसाई यांनी मानले.












