खारेपाटण हायस्कूलच्या पटांगणावर जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) प्रशिक्षण शिबीर 2023 चे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामीण भारतातील गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या गुणांना पारखून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेठ न. म. विद्यालय, ज्युनिअर कॉलेज खारेपाटण व सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिर 2023 चे आयोजन करण्यात आले आहे .

जिल्हास्तरावरून या शिबिरासाठी अनेक खेळाडू येणार असल्याने शिबिराचे स्वरूप हे निवासी व स्थानिक खेळाडूंसाठी अनिवासी अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे. शिबिराचा कालावधी हा 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 असा आहे .तसेच शिबिराची वेळ सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल. एकूण दहा दिवस हे शिबिर असेल. या शिबिरात राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच खारेपाटण पंचक्रोशीतील खेळाडूंना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व खारेपाटण हायस्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. सानप यांनी केले आहे. या ॲथलेटिक शिबिरामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक, थाळीफेक, शटल रन इत्यादी मैदानी क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण हे ५ वर्ष ते १८ वर्ष या वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी असणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी करावी.

शिबिरातील अनिवासी प्रशिक्षणार्थ्यांसाठी ५०० रुपये व निवासी प्रशिक्षणार्थ्यांसाठी १२०० रुपये माफक फी आकारण्यात येणार आहे. अनिवासी प्रशिक्षणार्थ्यांसाठी दहा दिवस सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाणार आहे. तसेच निवासी प्रशिक्षणार्थ्यांसाठी दहा दिवस सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या निवासाची सोय देखील केली जाणार आहे. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!