शासन आणि लोकसहभागातून नवसंकल्पनेचा सुरेख संगम लोरेवासीयांनी साधला
पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते श्री देव रुजेश्वर गार्डन चे शानदार लोकार्पण
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याने विकासाचे आदर्श मॉडेल बनवावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने लोरे गावासारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून पुढे येणे आवश्यक आहे. शासन आणि लोकसहभागचा सुरेख संगम साधत लोरे गाव राज्यासाठी रोल मॉडेल म्हणून पुढे येत आहे असे गौरवोद्गार पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी काढले. लोरे नं. १ गावातील श्री देव रूजेश्वर उद्यानाच्या उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी पालकमंत्री राणे बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद सीईओ मकरंद देशमुख, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे , सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव , ग्रामसेवक सर्व ग्रा पं सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, लोरे नं 1 गावाने शासनाचा आणि लोकसहभागाचा उत्कृष्ट समन्वय साधत ग्रामविकासाची नवी दिशा दाखवली आहे. या उपक्रमातून लोरे गाव विकासाचे रोल मॉडेल बनले आहे. “सिंधुदुर्गच्या प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल. आम्ही अशा प्रयत्नांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र निधी आणि सहकार्य पालकमंत्री म्हणून देईन.
लोरे नं. १ ग्रामपंचायती ने खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यामुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून साकार केलेले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिले उद्यान तब्बल १ एकर विस्तृत क्षेत्रात उभारण्यात आले असून, माजी पं स सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे उद्यान सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाला साद घालणार पर्यटन स्थळ आहे.या उपक्रमाची भरभरून प्रशंसा करताना नितेश राणे म्हणाले, “एकत्रितपणे काम केल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. लोरे गावातील सरपंच अजय रावराणे आणि त्यांच्या टीमने हे सिद्ध केले आहे. शासनसहभाग आणि लोकसहभागातून उभारलेला निधी तसेच त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आज हे सुंदर उद्यान उभे राहिले आहे.” “सिंधुदुर्गात गुजरात मॉडेलप्रमाणे एक खास विकास मॉडेल तयार करावे ज्याचे नेतृत्व लोरे गाव करेल व जिल्ह्याचा आदर्श बनेल,” असे त्यांनी सांगितले. ग्रामविकासाची ही प्रेरणादायी कहाणी सिंधुदुर्गातील आणि राज्यातील अन्य गावांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी पालकमंत्री यांनी माजी सभापती मनोज रावराणे यांचा विशेष उल्लेख केला . त्यांनी लोरे गावातील विकासकामांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनीही लोरे ग्रामपंचायत बद्दल गौरवउद्गार काढले आणि प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य ग्रामीण विकासाला राहील याची ग्वाही दिली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्ष म्हणून नेहमी आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत त्यातूनच सिंधुदुर्गच्या विकासाचा एक वेगळा आलेख आणि दीपस्तंभ तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मनोज रावराणे यांनी आपल्या मनोगतातून श्रीदेव रुजेश्वर उद्यानाचा प्रवास उलगडताना पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने आणि ग्रामीण पर्यटनाच्या कल्पनेने या उद्यानाची सुरुवात झाली. राणे कुटुंबियांना अपेक्षित विकासाच्या प्रत्येक विचारावर आम्ही सोबत आहोत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी दिवस-रात्र लढण्याची क्षमता आम्हाला त्यामुळेच प्राप्त होते,, त्यामुळे आमच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पसांगिले.*कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून सरपंच अजय रावराणे यांनी नामदार नितेश राणे साहेबांच्या भरघोस पाठिंबामुळे आणि दृढ विश्वासामुळे एवढे भव्य दिव्य स्वप्न आम्ही साकार करू शकलो आहोत याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद सीईओ मकरंद देशमुख, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार सभापती तुळशीदास राणे, सिंधुदुर्ग बँक संचालक दिलीप रावराणे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




