डिजिटल इंडिया डिजिटल आंबडोस” या उद्दिष्टातून दिले डिजिटल साहित्य
चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील आंबडोस गावच्या सरपंच सौ सुबोधिनी परब आणि त्यांचे पती श्री. राजेश परब यांनी स्वखर्चातून आंबडोस गावातील तीनही प्राथमिक शाळा एकाच वेळी डिजिटल करून मुलांच्या उज्वल भविष्यासाठी डिजिटल इंडिया डिजिटल आंबडोस गाव करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आंबडोस सरपंच सुबोधिनी परब यांच्या डिजिटल इंडिया डिजिटल आंबडोस या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत डिजिटल तंत्रज्ञानाचा शुभारंभ उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या शुभहस्ते सोमवारी सायंकाळी प्राथमिक शाळा आंबडोस नं. १ येथे करण्यात आला. यावेळी राजेश परब व सरपंच सुबोधिनी परब यांच्यावतीने देण्यात आलेले डिजिटल साहित्य गावातील तीन शाळांना प्रमुख पाहुणे दत्ता सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी आंबडोस प्राथमिक शाळा नं. १ ला, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, प्रिंटर, वेब कॅमेरा आणि माईक एवढे साहित्य देण्यात आले तर प्राथमिक शाळा आंबडोस कदमवाडीला लॅपटॉप, प्रिंटर, आणि वायरलेस कीबोर्ड हे साहित्य देण्यात आले. आणि प्राथमिक शाळा आंबडोस व्हाळवाडीला ला डेस्कटॉप प्रिंटर आणि वायरलेस कीबोर्ड एवढे साहित्य देण्यात आले.
तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचा सरपंच सौ. सुबोधिनी परब यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आंबडोस कदमवाडी शाळेचे शिक्षक श्री. संतोष नेरकर यांचा यावेळी आंबडोस गावाच्या वतीने उद्घाटक दत्ता सामंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गावातील दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, सरपंच सौ सुबोधिनी परब, माजी सरपंच दिलीप परब, आंबडोस ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आरोस्कर, राजेश परब, समीर सराफ, प्रशांत खोत, मंगेश पाटील, निखिल, हर्ष गावडे, प्रयाग सावंत, महादेव नाईक, मुख्याध्यापिका सुप्रिया सकडे, कदमवाडी शाळा मुख्याध्यापक संतोष नेरकर व्हाळवाडी शाळा मुख्याध्यापक देवेंद्र गोलतकर, आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दत्ता सामंत म्हणाले की, ” डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवल्यास विद्यार्थ्यांना शिकवलेले आत्मसात करणे सोपे जाते. पालकांनी आपली मुले शिक्षणात तरबेज होऊन स्पर्धेत टिकली पाहिजेत असे वाटत असेल तर जो कोणी त्यांना चांगला मार्ग दाखवत असेल त्याच्या पाठीशी राहून त्याला आशीर्वाद दिले पाहिजेत. राजेश परब हे गावातील तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील बेरोजगार तरुणांना योग्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा बहुमोल कार्य करत आहेत. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करतो. सरपंच सुबोधिनी परब आणि त्यांचे पती राजेश परब यांनी डिजिटल इंडिया डिजिटल आंबडोस या उपक्रमा अंतर्गत गावातील तीनही प्राथमिक शाळा डिजिटल करून एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. ”
त्याप्रमाणे सरपंच असा सुबोधिनी परब यांनी यावेळी गावातील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर शालेय जीवनापासूनच करता आल्यास त्याचा काय फायदा होईल हे सांगताना सांगितले की, ” शाळा ही ज्ञानाच्या आदान-प्रदानाच केंद्र आहे. पण अजूनही पारंपारिक रित्या पाठ्यपुस्तकातून मुलं शिक्षण घेत होती. सध्याच्या जमान्यात पारंपारिक शिक्षण आणि आधुनिक शिक्षण याच्यामध्ये खूप फारकत आहे. विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात जर उतरायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना जगातील घडामोडी जलद गतीने त्यांना कळण गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जेवढ्या सुख सुविधा दिल्या गेल्या पाहिजे तेवढ्या दिल्या जात नाहीत. आपल्या गावातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि सध्याच्या तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात आंबडोस गावची मुले कमी पडू नये यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
