वैभववाडी नगरपंचायत चे सत्ताधारी नगरसेवक, ठेकेदार व परप्रांतीय ठेकेदारात धक्काबुकी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभावे वैभववाडी नगरपंचायतीच्या विकास कामांचा ठेका भरण्यासाठी आलेल्या एक परप्रांतीय ठेकेदार, व अन्य एका ठेकेदाराला नगरपंचायत सत्ताधारी नगरसेवक व ठेकेदार यांनी जोरदार धक्काबुकी केली. त्यांच्या हातातील कागदपत्राची फाईल हिसकावून घेतली. त्या ठेकेदारांच्या बाजू घेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी याठिकाणी दाखल झाल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.  ही घटना गुरुवारी दुपारी नगरपंचायत कार्यालयासमोर घडली.मात्र सायंकाळी उशिरापर्यंत कोणाकडूनही वैभववाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्यावतीने विविध विकास कामांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा एका परप्रांतीय ठेकेदाराने भरली होती. त्याला स्थानिक ठेकेदार व सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध होता. नगरपंचायतीच्यावतीने गुरुवारी निविदा उघडण्यात येणार होती. यासाठी सदर परप्रांतीय ठेकेदार हा तहसील कार्यालय वैभववाडी येथे शपथपत्र करण्यासाठी गेला होता.  याची खबर नगरपंचायतीतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक व काही ठेकेदारांना लागली. त्यांनी तहसील कार्यालयात जात त्या परप्रांतीय ठेकेदाराला निविदा भरण्यापासून अडवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. यावेळी या ठेकेदाराची बाजूने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी बाजू घेतली. कोणीही ठेका घेऊ शकतो. तुम्ही त्याला आडवू शकत नाही. अशी भूमिका घेतली. त्यामुळे  सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. याची माहिती मिळताच त्याठिकाणी वैभववाडी पोलीस दाखल झाले. पोलीस दाखल होतात सर्वजण बाजूला झाले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व इतर पदाधिकारी हे नगरपंचायत कार्यालयात पोहोचले. नगरपंचायत कार्यालयात त्यांची मोठी गर्दी जमली होती.

त्यावेळी सदर परप्रांतीय ठेकेदार व अन्य एक ठेकेदार निविदा प्रक्रिये सहभागी होण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात जात  असताना त्यांना सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व इतर पदाधिकारी यांनी नगरपंचायत कार्यालयच्या गेटवरच रोखले. त्यांच्या हातातील कागद पत्राची फाईल हिसकावून घेतली.त्यांना धक्का बुकी करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारीही या ठिकाणी जमा झाले. यावेळी दोन्ही गटात जोरदार बाचाबाची झाली. मागाहून आलेले सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ  पदाधिकारी यांनी सर्वांना शांत करण्याचे काम केले. तसेच वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी पोलीस बंदोबस्तात दोन्ही गटांना शांत केले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत वैभववाडी पोलीस ठाण्यात कोणाकडूनही तक्रार देण्यात आली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!