गोळीबार करून ठार मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींची सिंधुदुर्ग एलसीबी ने केली धरपकड

राजस्थान जयपूर मध्ये गुन्हा करून शिरोड्यात लपले होते आरोपी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रमणपूरी, बणंद रोड, करधनी, जि. जयपूर, राज्य राजस्थान येथे शिवराज गॅंग, राजस्थानचे आरोपी हन्नी बिहारी आणि त्याच्या तीन साथीदारांनी खंडणीसाठी स्विफ्ट कारमधून येवुन फिर्यादी व साक्षीदार यांचा पिस्तूलने गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न करुन पळून गेले. त्यापैकी आरोपी (१) करन मातादिन पारीक, वय २२ वर्षे, रा. मोरीजा, पोलीस ठाणे आरमाडा, प्लॉट नं. ९, रमणविहार सोसायटी, मुरलीपूरा, ता. चौमू, जि. जयपूर, राज्य राजस्थान (२) दिपक सोमवीर जाट ऊर्फ लांबा, वय २० वर्षे, रा. सरदारपूरा, पोलीस ठाणे आरमाडा, ता. अमेर, जि. जयपूर, राजस्थान (३) नरेंद्रसिंग गजेंद्र चौहान, वय १९ वर्षे, रा. बेनार रोड, खोराबीसल, रामनगर ६ कॉलनी, प्लॉट नं. १ ता. अमेर, जि. जयपूर, राजस्थान यांनी गुन्हा केल्यानंतर अस्तित्व लपविण्यासाठी दि. २८/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वा. पासून शिरोडा येथे वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. सदर आरोपींविरुद्ध करधनी पोलीस ठाणे, जि. जयपूर (पश्चिम), राज्य राजस्थान येथे गुन्हा रजि. क्र. ९०/२०२५, भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९ (१), १८९ (४), ३०८ (२), भारतीय हत्यार अधिनिमय १९५९ (संशोधन २०१९) चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, करधनी पोलीस ठाणे, जयपूर यांचेकडील प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी हे शिरोडा, सिंधुदुर्ग व गोवा राज्यात असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिलेली होती. त्यानुसार विशेष पथके तयार करुन आरोपींचा सतत शोध घेण्यात येत होता. त्याचदरम्यान सदर आरोपी हे शिरोडा एस. टी. बस स्टैंड जवळील एका राजस्थानी बेकरी व्यवसायिकाच्या बेकरी जवळ राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन सापळा रचून तिन्ही आरोपींना शिरोडा येथून ताब्यात घेण्यात आले. यातील आरोपी करन मातादिन पारीक याच्याविरुद्ध जयपूर जिल्हयात दोन गंभीर गुन्हे दाखल असून त्यामध्ये लहान मुलीवर अत्याचार, अंमली पदार्थ विक्री अशा गुन्हयाचा सहभाग आहे. सदर आरोपी यापूर्वी दोन वेळा सुमारे ३ महिन्यापेक्षा जास्त कालावधी कारागृहात राहिलेला आहे. नागरीकांना धमकावून किंवा त्यांचेवर हल्ला करुन खंडणी गोळा करण्याच्या उद्देशाकरीता या टोळीकडून गुन्हे केले जात आहेत. सदर आरोपींना आज दि. ३०/०१/२०२५ रोजी करधनी पोलीस ठाणे, राजस्थान पोलीसांच्या ताब्यात दिलेले आहे.
वरील प्रमाणे कारवाई सौरभ कुमार अग्रवाल, (पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग), कृषिकेश रावले (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,पोलीस उप निरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर,आशिष गंगावणे,बस्त्याव डिसोजा,पोलीस नाईक चंद्रकांत पालकर,अमित तेली,जयेश सरमळकर यांनी केलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की, परंप्रांतीय व्यक्ती तसेच अनोळखी भाडेकरु यांना वास्तव्यासाठी ठेवताना किंवा रुम भाडयाने देताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून त्यांचे वैयक्तिक कागदपत्रांची पडताळणी करुन तशी नोंदणी करुन घ्यावी. तसेच, परप्रांतिय तसेच अनोळखी व्यक्तींच्या संशयीत हालचाली दिसून आल्यास तात्काळ जवळचे पोलीस ठाणे, पोलीस पाटील, सरपंच, लोकप्रतिनिधी यांना तात्काळ माहिती कळवावी किंवा पोलीस विभागास डायल ११२ या हेल्पलाईनवर संपर्क करुन माहिती देण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!