ओरोस (प्रतिनिधी) : पाणी म्हणजे जीवन आहे, म्हणुनच मानवी जीवनात स्वच्छ व शुध्द पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. जिल्हावासियांना शुध्द पाणी पुरवठा करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी असुन त्या करीता जिल्हा परिषद कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य व ग्रामपंचायत स्तरावरील भागधारक यांचे स्तर- 3 चे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन शरद कृषी भवन येथे करण्यात आले होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभाग उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, श्रीपाद पाताडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील आदी उपस्थीत होते. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची गुणवत्ता राखण्याकरीत तयार करण्यात आलेली पाणी गुणवत्ता माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमांचे प्रास्ताविक करताना विनायक ठाकुर यांनी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या नळपाणी योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. मात्र पाण्याची गुणवत्ता वाढविणे हे गावक-याच्या हाती आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, ग्राम पाणी पुरवठा समिती, पाणी गुणवत्ता विषय काम करणा-या महिला, जल सुरक्षक यांना मार्गदर्शन व्हावे या हेतुन हि पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पाणी नमुना कसा घ्यावा, त्याची तपासणी कशी करावी. तपासणी केलेले नमुणे ऑनलाईन कसे भरावे. जल सुरक्षक यांची कर्तव्य आदीची माहिती या पाणी गुणवत्ता पुस्तिकेच्या माध्यमातुन देण्यात आली आहे. हि पुस्तिका ग्रामपंचायत स्तरावर पाणी गुणवत्ताबाबत मार्गदर्शक ठरेल असे सागितले. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन निलेश मठकर यांनी केले.