चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन – भिमसेन गायकवाड पोलिस निरीक्षक निवती

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट ,अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्यां भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला. हा जादूटोणा विरोधी कायदा आपण सर्वांनी समजून घ्यावा आणि जादूटोणा कायदा समजून घेऊन जीवनात त्याचा अवलंब केलात आणि अलौकिक चमत्कारामागील आणि अकल्पित घटनेमागील सत्य जाणून घेतलात तर तुमच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल असे प्रतिपादन मा . भिमसेन गायकवाड पोलिस निरीक्षक निवती पोलिस ठाणे यांनी केले .

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलीस ठाणे निवती यांच्या पुढाकाराने निवती पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस पाटील यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे मार्गदर्शन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयीचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान निवती पोलिस ठाणे येथे त्यांनी आयोजित केले होते . त्यावेळी ते विचारमंचावरून बोलत होते . यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर , ॲड . स्वाती भाटकर मॅडम ,उपपोलिसनिरिक्षक पाटील साहेब आणि शेट्ये साहेब, पोलिस अंमलदार नितिन शेडगे साहेब , पोलिस हवालदार कांदळगांवकर साहेब आदी उपस्थित होते . जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना जादूटोणा विरोधी कायदा देवधर्माविरोधी नाही मात्र देव धर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्धच असल्याचे सांगितले . तसेच आपण सर्वांनी हा कायदा समजून घ्या .इतरांना कायदा समजून सांगा तुमच्या गावागावांमध्ये या कायद्याचं व्याख्यान आयोजित करा असे आवाहन केले . तसेच या कायद्यामध्ये कोणती कलमे आहेत ? हा कायदा कोणाला लागू आहे व कोणत्या कृतीसाठी लागू नाही याबाबत संपूर्ण माहिती देऊन एकूण बारा अनुसूचीच्या आधारावर जादूटोणा करणारे आणि भोंदू लोक आपल्यात अलाौकिकशक्ती आहे म्हणून सांगून कसे चमत्कार करतात आणि हातचलाखी करतात याची विविध प्रात्यक्षिके संतांच्या दाखल्यासहित करून दाखविली . यामध्ये पाण्याने दिवा पेटविणे , मंत्राने अग्नी पेटविणे , गड्ड्यात भूत उतरविणे , नारळातून करणी काढणे , मंत्राने अगबत्तीची दिशा बदलणे , हातातून सोन्याची चैन काढणे , जिभेतून तार आरपार काढणे , पेटता कापूर खाऊन दाखविणे , इत्यादी प्रात्यक्षिके सहज करून दाखविली . सदरची प्रात्यक्षिक पोलीस पाटील , तसेच महिला पोलिस पाटील यांच्याकडूनही करून घेतली .असेच कार्यक्रम जर गावागावात होत राहिले तर गावांमध्ये जनजागृती होईल आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्यांची दुकाने आपोआप बंद होतील . यासाठी सर्व पोलीस पाटील यांनी आपल्यागावांमध्ये बारा अनुसूची मधील कोणत्याही घटना घडत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी आणि आपल्या गावात कोणत्याही प्रकारे कोणाकडूनही जादूटोण्याचे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन केले .

error: Content is protected !!