चांगले काम करण्यासाठी शरीराची व मनाची तंदुरुस्ती महत्वाची – पालकमंत्री नितेश राणे

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी स्पर्धा आयोजित करून चांगले काम केले आहे. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करीत असताना आव्हानात्मक अशी परिस्थिती असते. चांगले प्रशासकीय कामकाज करावयाचे असेल तर अशा स्पर्धा होणे आवश्यकच आहे. चांगले काम करण्यासाठी शरीराची व मनाची तंदुरुस्ती ही तेवढीच महत्त्वाची आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून आपला जिल्हाही कसा विकसित करू शकतो, याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. वेंगुर्ले सारख्या सुविधा प्रत्येक तालुक्यात निर्माण करण्याच्या दृष्टीने ही प्रयत्न करावेत असे आवाहन वेंगुर्ले येथे बोलताना केले.

वेंगुर्ले कॅम्प येथील तालुका क्रीडा संकुल येथे आज १३ फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाना थाटात प्रारंभ झाला. मत्स्य विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. वेंगुर्ले येथे १५ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. कोकण विभागातील महसूलचे सुमारे २००० अधिकारी, कर्मचारी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उद्घाटन वेळी सर्वप्रथम मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व क्रीडा ज्योत पेटवून तसेच क्रीडा फलक फडकवून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महसूल विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघन जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी परितोश कंकाळ यांच्या सहित महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य गीत सादर करण्यात आले. तसेच सर्व सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांना वेंगुर्लेचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी क्रीडा शपथ दिली. यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघांनी संचलन केले. वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिनिधित्व करत क्रीडा ज्योत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सुपूर्द केली. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बलून सोडून व झेंडा दाखवून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी व अधिकारी रवी पाटील यांनी आभार मानले.

error: Content is protected !!