विजय चौकेकर यांना आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार तर वंदना करंबेळकर आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना संजय नाईक यांचे स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार तर बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना करंबेळकर यांना जाहीर झाला आहे.
मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, पेंडूरचे माजी सरपंच व कट्टा दशक्रोशीतील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व संजय नाईक यांचे अलीकडेच अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तो पुरस्कार चौके गावचे सुपुत्र, माजी मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना जाहीर झाला आहे.
विजय चौकेकर यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्ह्यातील अनेक शाळात काम केले आहे. उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती समाज मालवण तालुक्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी
उत्कृष्ट काम केले आहे. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या मालवण तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून ते अनेक उपक्रम राबवत असतात. सध्या त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा २०१३ च्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वाहून घेतले आहे. सिधुदुर्गातील अनेक गावे, शाळा महाविद्यालये अशा ठिकाणी अनेक शिबीरे ते या कायद्याची माहिती देण्यासाठी जातात व प्रात्यक्षिके दाखवतात. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी संजय नाईक स्मृति आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार विजय चौकेकर याना जाहीर करण्यात आला आहे.
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. यावर्षी निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना करंबेळकर यांना तो जाहीर झाला आहे. वंदना करंबेळकर या स्टेंट बॅक ऑफ इंडियाच्या माजी कर्मचारी असून समाज सेवेसाठी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. स्टेट बँकेचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. निरामय केंद्राच्या माध्यमातून त्या गेली ३० वर्ष सामाजिक सेवेत आहेत. ही संस्था प्रामुख्याने आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात काम करते. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. अन् ही सेवा गेली ३० वर्ष सातत्याने सुरू आहे. वंदना करंबेळकर यांचे साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तेलुगु लेखिका होल्गा यांच्या तीन पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. त्याशिवाय व्यंकटेश राजन यांच्या बोधशाला या अनुभव कथनाचा अनुवाद प्रकाशित केला आहे. याची दखल घेवून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिवजयंती दिनी पुरस्कारांचे वितरण शिवजयंती दिनी बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता केंद्र शाळा कट्टा नं १ सभागृहात मान्यवरांचे उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शाम पावसकर, वैष्णवी लाड, दीपक भोगटे, विणा म्हाडगुत, विकास म्हाडगुत यानी केले आहे.