पालकमंत्री नितेश राणेंनी माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या आठवणींना दिला उजाळा
स्व. आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळ्यात संपन्न
देवगड (प्रतिनिधी) : माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्यासारखे जनसंपर्क असलेला नेता सापडणे कठीण आहे. सर्वसामान्यांची नाळ जुळवून त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता लोकसेवा केली.असे मत मत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळ्यात नामदार नितेश राणे यांनी त्यांची आठवण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी आपल्या भाषणात गोगटे साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला. २०१४ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना, रोज कुणीतरी आप्पा गोगटे यांच्या कार्याची आठवण करून देतो, असे ते म्हणाले.
त्यांनी आप्पा गोगटे यांच्या जनसंपर्क कौशल्याचा उल्लेख करत, त्यांच्या लोकांशी थेट संवाद साधण्याच्या शैलीचे कौतुक केले. ओपन जीपमधून फिरून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याची त्यांची वृत्ती आजच्या नेत्यांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी साहेबांच्या उपस्थितीत, त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या उर्वरित कामाबाबत तसेच अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. आप्पा गोगटे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आश्वासन देत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
