रस्त्याच्या कडेलाच रोप लावली जात असल्याने भविष्यात वाहतूकीस अडथळा
आचरा (प्रतिनिधी) : प्रस्तावित सागरी मार्गाच्या दुतर्फा आचरा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर खाजगी ठेकेदारांमार्फत वड, पिंपळ, आपटा तत्सम मोठ्या वृक्षाच्या रोपांची केली जात असलेली लागवड चर्चेचा विषय बनला आहे. सागरी मार्ग प्रस्तावित असताना रस्त्यालगत मोठे वृक्ष होणारया झाडांची लागवड पैशाचा अपव्यय होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधल्यावर ठेकेदारावर तीन वर्षांसाठी देखभाल संगोपनाची जबाबदारी दिली असल्याचे सांगण्यात आले.तसेच सागरी महामार्गाबाबत अजून काही सुचना प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले.
कोकण किनारपट्टी भागातून जाणारा महत्वाकांक्षी रेवस रेड्डी सागरी महामार्गाची चर्चा सुरू असतानाच देवगड मालवण रस्त्यावर आचरा भागात रस्ता दुतर्फा खड्डे मारुन रोपे लावण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
वड, पिंपळसारखे पर्यावरण साखळीतील महत्वाचे असलेल्या वृक्षांच्या रोपांची लागवड केली जात आहे. विस्तारणारे हे वृक्ष एकदम रस्ता कडेला लावल्याने भविष्यात झाडे मोठी झाल्यावर वाहतूकीस अडथळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी तर एकदम रस्त्या लगतच खड्डे मारून रोप लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठे वृक्ष होऊन नंतर वृक्ष तोड होण्यापेक्षा अगोदरच योग्य जागी लागवड केली असती तर दुर्मिळ होत असलेल्या या वृक्षाचा पर्यावरणास मोठा हातभार लागला असता आणि शासनाच्या निधीचाही अपव्यय टळला असता.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.













