‘जि. प. शाळेतली मुलं हुश्शार’…!

वैभववाडी येथील गायत्री येनगे हिचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत सुयश

वैभववाडी (प्रतिनिधी) : जि. प. कोकिसरे बांबरवाडी शाळेची विद्यार्थिनी गायत्री अमोल येनगे हिने नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ओबीसी प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून सैनिक स्कूल, सातारा येथे आपला प्रवेश निश्चित केला आहे. तिच्या या सुयशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

इंडियन आर्मी,नेव्ही व एअरफोर्स मध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींसाठी केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या निगराणीखाली  सैनिक स्कूल सोसायटी देशभरात ३३ सैनिकी शाळा चालवते. या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात 'ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा' घेतली जाते.ही प्रवेश परीक्षा अत्यंत कठीण व अवघड मानली जाते. या परीक्षेसाठी दरवर्षी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थी प्रविष्ठ होतात. ८ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या प्रवेश परीक्षेत गायत्री अमोल येनगे हिने ३०० पैकी २६३ गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून 'सैनिक स्कूल सातारा' येथे तिने आपला प्रवेश निश्चित केला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. या शाळेत महाराष्ट्रातून केवळ पाच मुलींना प्रवेश मिळतो. त्यात गायत्रीने पहिल्याच प्रयत्नात प्रवेश मिळवला,हे विशेष. जिद्द,चिकाटी,सचोटी व अभ्यासातील सातत्य हे गायत्रीच्या यशाचे गमक आहे. तिचे वडील अमोल येनगे हे वैभववाडी तालुक्यात जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

गायत्रीला तिचे वर्गशिक्षक व मुख्याध्यापक जयवंत मोरे, शिक्षिका गीता टक्के, सुप्रिया शेटये, प्रफुल्ल जाधव व पालकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या सुयशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!