फोंडाघाट हायस्कूल व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने फेरीचे यशस्वी आयोजनगृह
फोंडाघाट (प्रतिनिधी) : भटक्या जनावरांच्या शेतकऱ्यांना “माझे पशुधन, माझी जबाबदारी” ची जाणीव होऊन त्यांचा बंदोबस्त करताना, समाज प्रबोधन व्हावे,याकरिता आज आठवडा बाजाराचे दिवशी ग्रामपंचायत ते एसटी स्टँड पर्यंत फोंडाघाट हायस्कूल आणि फोंडा ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने,जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यामुळे पेठेतील सकाळ, मोकाट जनावरे सोडणाऱ्या शेतकऱ्यांना निर्वाणीचा इशारा देणाऱ्या घोषणांनी गजबजुन गेली. बाजारात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा प्रश्न जटिल होत असताना, येणाऱ्या शेतकऱ्यांना मोकाट जनावरांपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याची सूचना मिळाली.
यावेळी बोलताना सरपंच सौ. संजना आग्रे, मोकाट जनावरांच्या मालकांना वेळीच पशुधन सांभाळा आणि संभाव्य डोके टाळण्याचा इशारा दिला. अन्यथा यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सूचित केले. ग्रामस्थांतर्फे संतोष टक्के यांनी, ग्रामस्थ- वयोवृद्ध- रुग्ण- पर्यट, वाहन चालक, व्यावसायिक यांना मोकाट जनावरांमुळे पेठेत त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान होते. अपघात होतात. मात्र जनावरांचे मालक आपली शेतीची कामे झाली की, जनावरे बांधून ठेवण्याऐवजी, मोकाट सोडून पुन्हा पाऊस पडेपर्यंत सुशगात असतात. त्यामुळे त्यांना “माझे पशुधन, माझी जबाबदारी” ची जाणीव व्हावी, यासाठी ही जनजागृती फेरी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी याबाबत सतर्क व्हावे,अशी ही विनंती केली.
यावेळी सरपंच संजना आग्रे, तन्वी मोदी, या उपक्रमाचे संयोजक पिंटू पटेल,जयेश भोगले, प्राची धुरी, इत्यादी सदस्य, सुहास मोदी, संतोष टक्के इत्यादी ग्रामस्थ, तसेच हायस्कूलच्या विद्यार्थिनी विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे फोंडा ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे













