मसूरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित भाई गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल मेंबर संतोष राणे व राजन नाईक यांनी फ्लाय 91 या विमान कंपनीच्या गोवा येथील कार्यालयात कंपनीचे मालक व अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून फ्लाय 91 ची उड्डाणे नियमित होण्यासाठी आग्रही निवेदन दिले. प्रामुख्याने सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी फ्लाय 91 ने प्रयत्न करावेत अशी मागणी मासीया तर्फे करण्यात आली. त्यावेळी ही सेवा सुरू होण्यासाठी मुंबई येथे मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणे अत्यावश्यक असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले, व त्याचवेळी विमान कंपनीचे मालक मनोज चाको यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने सदरील स्लॉट मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती केली. डॉ. श्रीकृष्ण परब यांनी सिंधुदुर्ग- सोलापूर, सिंधुदुर्ग -पुणे, सिंधुदूर्ग – नाशिक, सिंधुदूर्ग – छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग- हैदराबाद व सिंधुदुर्ग- बेंगलोर ही विमान सेवा सुरू करण्याविषयी निवेदन दिले. त्यालाही फ्लाय 91 च्या अधिकाऱ्यांनी मान्यता देत लवकरच या सेवा ही नियमित करण्यात येतील असे आश्वासित केले. यावेळी फ्लाय 91 चे सर्वेसर्वा मनोज जी चाको, चीफ रेवेन्यू ऑफीसर आशुतोष चिटणीस, जनरल मॅनेजर निमिश जोशी, आणि सेल्स मॅनेजर सतीश खाडे उपस्थित होते.
चिपी वरून प्लाय 91 ची नियमित उड्डाणे व्हावीत ! कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांचे कंपनीला निवेदन











