छत्रपती संभाजी महाराज पुण्य दिनाच्या निमित्ताने शाळेत दाखवण्यात आला चित्रपट
वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज पुण्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, बलिदान व आदर्श नव्या पिढीला समजावा तसेच राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा, स्वाभिमान शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजावा या उद्देशाने वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून प्रशालेच्या सभागृहात ‘छावा’ चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटातील काही प्रसंग पाहताना अनेक विद्यार्थी भारावले तर काहींना अश्रु अनावर झाले. चित्रपटाच्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने शालेय परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला. चित्रपटाच्या सुरुवातीला एस.बी.शिंदे यांनी सदर चित्रपटाबाबत ऐतिहासिक संदर्भ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. प्रशालेचे शिक्षण योगेंद्र चव्हाण, मंदार चोरगे, शिक्षकेतर कर्मचारी रत्नाकर फुटक, शशिकांत रावराणे यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











