आंदोलनाचा दुसरा दिवस!
तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तसेच अनेक वेळा आश्वासन देऊनही प्रलंबित कामांची पुर्तता होत नसल्याने आणि अनेकवेळा लक्ष वेधूनही माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात कोणतीच सुधारणा होत नसल्याचा आरोप करीत शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने शिक्षण विभागाच्या विरोधात एल्गार पुकारला असून सोमवार पासून ओरोस येथे साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
अनेक प्रस्तावासाठी लागणारी चेकलिस्ट जाहीर करण्यातही दिरंगाई होत आहे. तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना दिलेले आश्वासनही पूर्ण करण्यात आलेले नाही. असे एक ना! अनेक आरोप करीत शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने माध्यमिक शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीविरोधात सिधुदूर्गनगरीतील जि. प.समोर साखळी धरणे सुरू केले आहे.
या आहेत मागण्या…
माध्यमिक शिक्षणाधिकारी थकित वेतन देयके, वैद्यकीय बिले, वैद्यकीय बिलासाठी लावण्यात आलेली शिधापत्रिका अट शिथील करणे, ना- परतावा अग्रीम, रजा कालावधीतील प्रस्ताव, नागरिकांची सनद कार्यालयाबाहेर लावणे, सहविचार सभा घेणे, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर यांचे पेन्शन प्रस्ताव पाठविणे इत्यादी कामे पूर्ण केली जातील असे तोंडी आश्वासन दिले गेले होते. मात्र ही कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने याकडे विशेष लक्ष वेधण्यात आले आहे.दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात क्रोणतीच सुधारणा होत नसल्याचा आरोप करीत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कोणताही फक्त प्रस्ताव सादर करून घेतला जातो. मात्र प्रत्येक टेबलवर वेगळा कागद द्यावा लागतो. यात बराच विलंब होतो तो टाळण्यासाठी प्रस्तावाबाबतची चेकलिस्ट देण्याची मागणी केली आहे. मात्र ती देण्यास दिरंगाई केली जात असून यामागील नेमके कारण काय ? असा संतप्त सवाल आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
न्यायालयीन मान्यता मिळालेल्या शिक्षकाना मान्यता दिनांकापासूनच सर्व लाभ देण्यात यावेत, अशी संघटनेची मागणी आहे. मात्र ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिक्षणाधिकाऱ्यांची प्रस्तावाला मान्यता असतानाही उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षणाधिकाऱ्यांची स्वतंत्र शिफारस पत्र देण्याची मागणी अव्यवहार्य असल्याचा आरोप करण्यात आला.याबाबत मागील आमदार सभेत झालेल्या चर्चेतील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आश्वासनांची पूर्तता कार्यालयाकडून झालेली नाही.
जोपर्यंत प्रलंबित कामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार!
जोपर्यंत उपरोक्त शिक्षण विभागातील प्रलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दररोज दु. ३ ते सायं. ५ या वेळेत साखळी धरणे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.या आंदोलनात शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, उपाध्यक्ष जनार्दन शेळके,दीपक तारी, हेमंत सावंत, गिरीश गोसावी,सागर फाळके यांच्यासह अनेक शिक्षकांनी साखळी उपोषण छेडले असून जिल्हाभरातील अनेक शिक्षक या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी ओरोस येथील साखळी धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित होते.











