शिष्यवृत्ती परीक्षेतून उद्याचे शासकीय अधिकारी घडतील – मुख्याधिकारी गौरी पाटील

कणकवली (प्रतिनिधी) : प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या परीक्षेतील टाॅपर शासकीय परीक्षेतही टाॅपर असतात, ही बाब अभिमानास्पद आहे. शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी भविष्यात शासकीय अधिकारी बनलेले दिसतील, असा विश्वास कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी व्यक्त केला.

प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील यशवंतांचा गुणगौरव सोहळा संस्थानच्या सभागृहात आयोजित केला होता. प्रसंगी पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत, खजिनदार दादा नार्वेकर, सचिव निवृत्त धडाम, मुरलीधर नाईक, प्रसाद अंधारी, नागेश मुसळे, शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर,संस्थानाचे व्यवस्थापक विजय केळुसकर, काशिनाथ कसालकर, दिवाकर मुरकर, सोनुर्लेकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत अभ्यास केल्यास अभ्यासाची भीती वाटणार नाही. विद्यार्थ्यांनी गणित व बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास नियमित केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे एक छंद पाहिले पाहिजे. अभ्यासाचा छंद लागल्यास तुमच्या पदरी नेहमीत यश पडत राहील. विद्यार्थ्यांच्या जीवनात पालक व शिक्षकांचे योगदान मोठे असते, असे त्यांनी सांगून आजपर्यंतच्या जीवनप्रवासात आलेले चांगले व वाईट अनुभव त्यांनी शेअर केले.

सुरेश कामत म्हणाले, शैक्षणिक मंडळाने गेली ४० वर्षे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा दर्जा कायम ठेवला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन अधिकारी बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी गजानन उपरकर, दिवाकर मुरकर तर पालकांमधून बापू कोरगावकर, पालव यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधून अर्णव भिसे, सुंमगल शिखरे, दुर्वांक गावडे यांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर परीक्षेत यश संपादन केलेल्या ४२ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. संस्थान व शैक्षणिक मंडळाच्यावतीने गौरी पाटील, डी. एड. काॅलेजचे प्राचार्य सोनुर्लेकर, प्रकाश परब सत्कार करण्यात आला. आरंभी सरस्वती माता व प. पू. भालचंद्र महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून गुणगौरव सोहळ्याचे उदघाटन केले. प्रास्ताविक सुहास आरोलकर यांनी केले. सूत्रसंचालन किरण कोरगावकर यांनी केले. आभार मंगेश तेली यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!