सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बागेतील काजू काढून नेल्या रागातून मयत संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर ( वय ५२, रा. कवठी अन्नशांतवाडी, ता.कुडाळ ) याला जबर मारहाण करून जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यातील कवठी गावातील आरोपी शामसुंदर प्रभाकर वाडयेकर, रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर, शैलेश दत्ताराम करलकर या तिघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. बागेतील काजू काढून नेले म्हणून संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर याच्या घरी जाऊन वरील तिन्ही आरोपींनी संदीप याला दांड्याने मानेवर हातावर पायावर डोकीवर जबर मारहाण करून जीवे ठार मारल्याचा गुन्हा निवती पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली होती. या गुन्ह्यात संतोष दामोदर करलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शामसुंदर प्रभाकर वाडयेकर, रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर, शैलेश दत्ताराम करलकर यांच्या विरोधात निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून जामीनावर मुक्तता होण्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर सुनावणी वेळी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेत पुढील मुद्दे न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून जामीन फेटाळण्यासाठी युक्तिवाद केला. सदर गुन्हा गंभिर असून आरोपी व साक्षीदार हे एकच गावातील व शेजारील वाडीतील आहेत. जामीन मिळाल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणून सत्य हकीकत सांगण्यापासून परावृत्त करू शकतात, गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून आरोपी महत्वाचे पुरावे नष्ट करू शकतात, खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपी उपस्थित राहतील याची खात्री नाही, अद्याप गुन्ह्याचे चार्जशीट कोर्टात सादर केले गेले नाही. या बाबींकडे न्यायाधीशांचे लक्ष सरकारी वकील देसाई यांनी वेधले. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख यांनी तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यात करलकर बंधूंसह वाडयेकर चा जामीन फेटाळला










