प्रा.रचना अडसुळे यांचा महाराष्ट्रातील आंबेडकरी युवक, चेंबूर यांचेकडून पुरस्काराने सन्मान

धुळे ग्रामीण व शहरी भागातील वृद्ध आदिवासी महिलांसाठी केलेल्या समर्पित कार्यासाठी करण्यात आला सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन, माता रमाई जयंती आणि माता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनाच्या निम्मित महिला सन्मान मेळावाचे आयोजन नुकतेच ‘मुंबई व महाराष्ट्रातील आंबेडकरी युवक’ यांच्या मार्फत चेंबूर, मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण भागातील व आदिवासी महिलांसाठी विशेष कार्य करणाऱ्या प्रा.रचना अडसुळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील विविध क्षेत्रातील (सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि इतर) तसेच अनेक विभागातून म्हणजेच कोणी शहरातून तर कोणी गांव खेड्यातून आलेल्या अनेक महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रा. रचना अडसुळे यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. अडसुळे यांनी धुळे ग्रामीण व शहरी भागातील वृद्ध आदिवासी महिलांसाठी केलेल्या समर्पित कार्याबद्दल महिला सत्कार सन्मान मेळाव्यात ‘मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवक चेंबूर, मुंबई’ यांच्या कडून पुरस्कार देण्यात आला. प्रा.रचना अडसुळे यांनी अथक प्रयत्नांनी महिलांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे. त्यांचे सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायक आणि समाजासाठी अनमोल आहे.

तसेच प्रा.रचना अडसुळे यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून कोरोनाकाळात अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील जनतेला मदत कार्य उभारले होते. ग्रामीण भागातील उडाणे, कुंडाणे या गावातील निराधार कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, आदिवासी कुटुंबाना रेशनकार्ड मिळण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरवा करून रेशनकार्ड मिळून दिले, परप्रांतीय प्रवासी कामगारांना मदत केली. या कार्यामुळे त्यांना सप्तश्रंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे व चिईल्ड लाईन १०९८ प्रकल्प, धुळे यांच्याद्वारे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले होते. सद्या प्रा. रचना अडसुळे ह्या समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून आहेत.

या यशामुळे समता शिक्षण संस्था पुणेचे अध्यक्ष प्रा. उषाताई वाघ, सचिव डॉ. जालिंदर अडसुळे व संस्थेचे सन्मानीय पदाधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी यांनी प्रा. रचना अडसुळे यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!