म्हापसा मधे जीवन आनंद संस्थेची रॅली संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरचे बेघर, निराधार, वंचित बांधव हे आपले बांधव आहेत. मनोरूग्णता, व्यसनाधीनता, दारिद्र्य, कुटुंबातील विस्कळीतता आदी कारणांनी त्यांना रस्त्यावरचे निराधार वंचिततेचे जीवन जगावे लागते. आपण त्यांना भीक न देता माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळवून देवूया. असे आवाहन म्हापसातील जनतेला, व्यापारी वर्गाला जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी केले.
रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी कार्य करणारी जीवन आनंद संस्था आणि म्हापसा येथील सारस्वत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत दरम्यान ते बोलत होते. म्हापसा शहरासह गोवा राज्यात एकही निराधार बेघर माणसाला रस्त्यावरील वंचिततेचे जीवन जगावे लागू नये. विविध कारणांनी निराधार आणि बेघर असणा-या बांधवांचे पुनर्वसन व्हावे. निराधार बांधवाना भीक नाही तर माणूसकीचे जीवन मिळावे. म्हापसा शहर स्वच्छ व सुंदर बनावे. याच विचार भूमिकेतून जीवन आनंद संस्था आणि सारस्वत महाविद्यालय संयुक्तपणे मोहिम राबवित आहेत. याच मोहिमेचा चा भाग म्हणून म्हापसा येथील जनजागृती रॅली आयोजिण्यात आली होती. अशी माहिती सारस्वत महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.संतोष पाटकर यांनी यावेळी दिली.
रॅलीमध्ये सहभागी सारस्वत महाविद्यालय, डिएमसी महाविद्यालयाचे विद्यार्थी , जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते आणि आश्रमातील बांधवासह सहभागी स्वयंसेवकांनी यावेळी ‘ रस्त्यावरचा निराधार बांधव = माझा बांधव-माझा बांधव’, ‘ माणूसकीची भिक नको = हक्क हवा , हक्क हवा ‘, ‘स्वच्छ शहर-सुंदर शहर = म्हापसा शहर,म्हापसा शहर, अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. राष्ट्रोळी मंदिर पासून सुरू झालेल्या रॅलीने संपूर्ण म्हापसा टॅक्सी स्टॅण्ड परिसर, महात्मा गांधी पुतळ्याला वळसा घालून डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात रॅलीचा समारोप झाला. सारस्वत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष पाटकर,जीवन आनंद संस्थेच्या विश्वस्त पूनम बुरये, संदेश बुरये चुरी, विश्वस्त किसन चौरे प्रा. निता नासनोडकर, प्रा.साहिल सावकार, श्री व श्रीम आवटे, श्री.शेटटये यांची यावेळी उपस्थिती होती. प्रसाद व प्रांजल आंगणे, आशिष व विजया कांबळी, आरती वायंगणकर, सचिन पडते, नरेश आंगणे , विद्या गुरव, नमिता चव्हाण, पल्लवी , प्रणाली यांची रॅलीच्या संयोजनात महत्वाची भुमिका राहिली.
















