फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवात्मक शिक्षण उपक्रम अंतर्गत गांडूळखत निर्मिती व्यवसायाचे शिक्षण घेत आहेत. शेतीला पुरक असा उद्योग म्हणजे गांडूळखत निर्मिती. अशा प्रकारच्या व्यवसायामधून आपण मोठया प्रमाणात फायदा मिळवू शकतो. विद्यापीठाने सूचित केलेल्या महत्वपूर्ण गांडुळांच्या जतींपासून तयार झालेल्या गांडूळखताची मोठया प्रमाणात मागणी आहे हे लक्षात घेवून कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गांडूळखत निर्मिती केली आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शास्त्रीयदृष्या गांडूळखत निर्मितीसाठी लागणारी सर्व पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन गांडूळखत निर्मितीसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व प्रक्रिया, जातिवंत गांडूळ, पाणी व्यवस्थापन, निर्मितीनंतर काढणी व्यवस्थापन या सर्व गोष्टी आत्मसात केल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून ते नियंत्रित पद्धतीने गांडूळखत निर्मिती करून त्यांची विक्री फोंडाघाट पंचक्रोशीतील बाजारपेठांमध्ये, शेतकरी व घरोघरी फिरुन गांडूळखताची माहिती पटवून देऊन विक्री करत आहेत.

या उपक्रमात कु. मयुरेश पाटील, वेदांत एकल, आकाश बाळूमाने, वैभव धायगुडे, वैभव आर्गे, सौरभ भालबर, ऋग्वेद भेंडवडेकर, विशाल भोसले ,अक्षय बंडगर, अमन फरास, पांडुरंग बोभाटे, सौरभ आहिर, जयदीप बल्लाळ, सचिन बिरादार, प्रशांत छल्ला, प्रतीक्षा भिऊंगडे, सुषमा ढेंगे, तन्वी देसाई, ईश्वरी बोगटे, धनश्री धवन, ऋतुजा भोये, महिमा धुरी, पूजा गडकरी सहभागी झाले आहेत. उपक्रमासाठी ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे अध्यक्ष दीपेश मराठे, खजिनदार विद्या राणे-पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पांडुरंग मोहिते, प्रा.पियूष शिर्के आणि उपक्रम प्रमुख प्रा. सलोनी पाटील, विभाग सहाय्यक संदेश धवन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे.












