सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : गुंतवणुकीतून दरमहा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून २ कोटीहून अधिक रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरी येथील आरजु टेकसोल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड चा प्रमुख पदाधिकारी मुजफ्फर अलसुलकर आणि कॅशियर अनिल पाटील या दोघांचाही जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग करत आहे. या गुन्ह्यातील आरोपी मुजफ्फर अलसुलकर आणि अनिल पाटील यांना ७ मार्च २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना ८ मार्च पासून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या सावंतवाडी जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीनावर मुक्तता होण्यासाठी आरोपी मुजफ्फर अलसुलकर आणि अनिल पाटील यांनी जिल्हा न्यायालयात सादर केलेल्या अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेत जामीन नामंजूर होण्यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.