वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा मार्केटिंग कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत तिसरा मजला ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आहेत. अशी माहिती कोकण विभाग मार्केटिंग फेडरेशनचे संचालक प्रमोद रावराणे यांनी दिली आहे. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रावराणे यांनी ही माहिती दिली. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे खासदार नारायण राणे,विधान परिषद सदस्य अँड निरंजन डावखरे,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील,मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे,माजी आमदार जयंत पाटील,अजित गोगटे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत तसेच फेडरेशनचे सर्व संचालक या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील पहिले जिल्हा मार्केटिंग कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्नाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे कार्यालय होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे रावराणे यांनी सांगितले. याच दिवशी दुपारी तीन महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात अशाप्रकारे मार्केटिंग फेडरेशनची ही पहिलीच सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असल्याची माहिती ही रावराणे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाचणी पिकाला शासनाच्या भात खरेदी प्रमाणे हमीभाव देऊन शासनाने खरेदी करावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत त्याचप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होत असल्यामुळे याबाबतचा अभ्यास करून जिल्ह्यात काजू प्रोसेसिंग युनिट लवकरच सुरू करण्यात येणार आहे.ओसरगाव व माणगाव येथे फेडरेशनची गोडाऊन आहेत. त्या ठिकाणी ही युनिट सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावा व बाजारपेठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी कार्यालयाच्या उद्घाटनाला जिल्ह्यातील सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन रावराणे यांनी केले आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाचे 11 एप्रिल रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
