खारेपाटण येथील शालेय विद्यार्थी उन्हाळी क्रीडा शिबिराचा शुभारंभ समरोप संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव व संकेत शेट्ये यांच्या सौजन्याने विविध गटातील शालेय विद्यार्थ्यांकरिता दि. २५ एप्रिल २०२५ ते दि. ५ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा शिबिराचा समारोप कार्यक्रम नुकताच खारेपाटण येथील श्री देव केदारेश्वर मैदानाच्या भव्य पटांगणावर संपन्न झाला.
उन्हाळी क्रीडा शिबिर तथा या समर क्रीडा शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला शिबिराचे आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव व संकेत शेट्ये यांसह खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष मधुकर गुरव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, डॉ.उमेश बालन, ऍडव्होकेट प्रमिला शेट्ये, वसीम मुकादम, बबलू बाबर देसाई, तेजस राऊत, कांता झगडे, क्रीडा प्रशिक्षक अमोल चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी सतीश गुरव व संकेत शेट्ये मित्र मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या शिबिराचा फायदा येथील येथील शालेय विद्यार्थ्याना झाल्याबद्दल ग्रामस्थानी आयोजकांचे आभार मानून अशा प्रकारची शिबिरे प्रत्येक वर्षी घेण्यात यावी असे सुचवले. सलग १५ दिवस चालेल्या या शिबिरात व्हॉलीबॉल, क्रिकेट, सेपक टकराव, लेझिम, लाठीकाठी मर्दानी खेळ, नृत्य आदी खेळ व कलांचा सराव विद्यार्थ्यांकडून घेण्यात आला होता. तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक शमतेत वाढ होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने असे क्रीडा शिबिर आवश्यक असल्याचे उदगार माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना काढले.
तसेच या शिबिराच्या कालावधीत गारगोटी जि. कोल्हापूर येथून आलेले हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू आदित्य शंकर पोवार व राहुल दिलीप मोहिते यांचे विद्यार्थ्यांना विशेष असे मार्गदर्शन लाभले. या शिबिरातील सर्व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांकडून सहभाग प्रमाणपत्र व मेडल्स देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तर या उन्हाळी क्रीडा शिबिरात एकूण ६५ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंगेश गुरव यांनी मानले.















