वैभववाडी (प्रतिनिधी) : भगवान गौतम बुध्दांनी जगाला समता, करुणा आणि अहिंसेचा अद्वितीय संदेश दिला. आजही त्यांचे विचार जागतिक शांततेसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. बुध्दांनी चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्गाद्वारे मानवी जीवनातील दुःख, त्याचे कारण आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग स्पष्ट केला. त्यांच्या शिकवणुकीतून केवळ धार्मिक विचार नव्हे, तर सामाजिक समता आणि न्यायाचाही गाभा आढळतो. भगवान बुद्धांचे विचार हे केवळ धार्मिक नव्हे, तर मानवतेचे सार्वत्रिक तत्त्वज्ञान आहे ज्याची आजच्या जगाला अधिक गरज आहे. असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी केले. खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई/ग्रामीण व महिला मंडळ आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके,भगवान कांबळे, कृष्णा भिकाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष प्रदीप कांबळे, ग्रामीण अध्यक्ष दीपक आत्माराम कांबळे, सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम, केशव गुणाजी कांबळे,पोलीस पाटील राखी पवार, अस्मिता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बुद्ध धम्म अभ्यासक जयवंत मोरे म्हणाले,बुद्धांनी सांगितले की, कोणतीही गोष्ट फक्त ऐकिव, परंपरा, ग्रंथ, तर्क किंवा गुरूंच्या आदरावर आधारित मान्य करू नये. त्याऐवजी, जेव्हा एखादी गोष्ट स्वतःच्या अनुभवाने आणि विवेकाने हितकारक वाटते, तेव्हाच ती स्वीकारावी. बुद्ध तत्वज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन नैतिक विवेक आणि स्वतंत्र विचारसरणीला प्रोत्साहन देते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हा संदेश जनमानसात पोहोचला पाहिजे. मुळे समाजात शांती करुणा आणि विवेकाचा प्रचार होईल असे सांगितले. संस्कृती संतोष कांबळे या विधार्थीनीने महापुरुषांच्या जीवनावर बोलताना प्रभावी मांडणी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तीच्या वक्तृत्वाला सर्वांनी दाद दिली. कार्यक्रमाचे प्रारंभी धम्म ध्वजारोहण आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन ने करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आणि 45 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात महिलांचे व मुलांचे विविध फणी गेम्स संपन्न झाले.रात्री मुलांचे आणि महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली. सूत्रसंचालन पोलिसाटील रुपेश कांबळे, तर आभार मंगेश कांबळे यांनी मानले.












