पेट्रोलने पेटवून जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यात जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : आपल्या घटस्फोटित पत्नीला पेट्रोल ओतून जाळून ठार मारल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सुशांत सहदेव गोवेकर ( रा.धुरिवाडा मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकार पक्षाच्या वतीने यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी सुशांत सहदेव गोवेकर याने त्याची घटस्फोटित पत्नी सौभाग्यश्वरी सुशांत गोवेकर हिच्या अंगावर पेट्रोल ओतून लायटर ने आग लावून पोबारा केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सौभाग्यश्वरी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना 25 सप्टेंबर 2024 रोजी मालवण एसटी स्टँड समोर घडली होती. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सुशांत सहदेव गोवेकर याने जामीन मंजूर होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्द्यांच्या आधारे युक्तिवाद केला. आरोपी सुशांत सहदेव गोवेकर याने अत्यंत गंभीर गुन्हा केलेला आहे. घटस्फोटित पत्नी ने दुसरे लग्न केल्याच्या रागातून त्याने तिचा खून केला आहे. खुनाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आरोपी सुशांत सहदेव गोवेकर हा डोक्यात राग ठेवून गुन्हा करणारा आहे.
आरोपी सुशांत सहदेव गोवेकर आणि फिर्यादी एकाच वाडीत राहणारे असून आरोपीला जामीन मंजूर झाल्यास फिर्यादीच्या जीवितास धोका पोचू शकतो. साक्षीदार तसेच पंच यांच्या जीवितास धोका पोचवू शकतो, त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी आरोपी सुशांत सहदेव गोवेकर चा जामीन अर्ज नामंजूर केला.

error: Content is protected !!