वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा आणि इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “अहिल्याबाई होळकर : एक आदर्श शासिका आणि जनसेविका” आणि “शौर्य, सेवा आणि श्रद्धेचा संगम : अहिल्याबाई होळकर” या विषयांवर आधारित निबंध स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातून स्पर्धकांनी भाग घेतला.
या स्पर्धेत अनिकेत सदाशिव कुंडगीर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विद्या सुनिलदत्त परब यांना द्वितीय क्रमांक मिळाला. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ०५ जून रोजी सकाळी ११ – ०० वा. भाजपा कार्यालय वेंगुर्ला,गणेश मोबाईल शॉपी च्या वर, शिरोडा नाका येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तसेच या दोन्ही विजेत्यांचे निबंध जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुढे पाठवण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले. त्यांनी निवेदनात म्हटले की, “अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील आदर्श तत्वे आजच्या तरुणाईस प्रेरणा देणारी आहेत. स्पर्धकांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे मांडली आहेत. विशेषतः विजेत्या निबंधांमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन आणि समाजसेवेच्या तत्त्वांचा समतोलपणे विचार केला गेला आहे.”
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उपक्रमाचे जिल्हा समन्वयक प्रसन्ना देसाई व मंडल अध्यक्ष पपु परब व स्पर्धा प्रमुख अँड. सुषमा खानोलकर यांनी केले आहे.












