चौके हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
चौके (प्रतिनिधी) : भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके विद्यालयामध्ये माध्यमिक शाळांत परीक्षा 2025 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला. विद्यालयाचा निकाल सलग सहा वर्षे 100% लागल्याने संस्थेतर्फे तसेच प्रशाळेतर्फे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चौकी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष जयराम परब,प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक प्रसाद देवधर, स्थानिक समितीचे अध्यक्ष बिजेंद्र गावडे, संस्थेचे सचिव संतोष धुरी, खजिनदार सुरेश चव्हाण, स्थानिक समिती उपाध्यक्ष अनिल सुकाळी, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष शामसुंदर मेस्त्री, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी, पत्रकार संतोष गावडे, नितीन गावडे, सदाशिव गावडे, विजय चौकेकर, दत्ता गावडे, सुरेश चौकेकर, पंचक्रोशीतील गावांचे सरपंच तसेच पोलीस पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये संतोष धुरी आणि मुख्याध्यापिका गोसावी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनस्वी अभिनंदन करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच कोणतेही चांगले काम छोटे न मानता ते सातत्याने करावे. जर आपल्या घरी लक्ष्मी यावी असे वाटत असेल तर सरस्वती प्रसन्न करून घ्यावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधना करून जास्तीत जास्त गुण भविष्यामध्ये मिळविण्याचे प्रयत्न करावेत. आपल्या संस्थेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्यासाठी विद्यार्थी कौशल्य आधारित अनेक उपक्रम राबविण्याचे संस्थेने नियोजन केले पाहिजे. आपली आवड आणि करत असलेले काम याचीच योग्य सांगड घालता आली तर आपल्याला यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक प्रसाद देवधर यांनी केले.
बिजेंद्र गावडे आता गुणवत्तेचा स्तर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे सातत्याने प्रयत्न करत असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून संस्थेस सहकार्य करावे असे नमूद केले. या कार्यक्रमात पां. काकतकर कल्याण ट्रस्ट यांच्यातर्फे सुद्धा विद्यार्थ्यांना रोख रक्कम पारितोषिक वितरण करण्यात आले. माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये प्रथम आलेल्या कुमारी निहारिका महेश सावंत हिच्या आई-वडील तसेच राज्यस्तरीय फायबॉक्सिंग स्पर्धेत राज्यात द्वितीय आलेल्या रिद्धी कांबळी हिच्या आई-वडिलांचा आदर्श माता-पिता म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, आदर्श व्यापारी संघ चौके, ज्येष्ठ नागरिक संघ, निरा सावंत यांनी व्यासपीठावर सन्मान केला. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष जयराम परब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सदर गुणवत्ता अजून वाढवणे गरजेचे आहे, यासाठी लागणारी सर्व मदत संस्थेकडून केली जाईल अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सहशाले उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेऊन शाळेचे नाव उज्वल करावे व स्वतःचा उत्कर्ष साधावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तप्रसाद परुळेकर यांनी केले.



