फोंडा केंद्र शाळा नंबर एक ची वारकरी दिंडी आणि विविध पोशाखातील संत – विठ्ठल- रखुमाई लक्षवेधी..
फोंडाघाट (प्रतिनिधी) : केंद्रशाळा नंबर एकच्या छोट्या मुला- मुलींनी शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. यामध्ये संत नामदेव,संत एकनाथ, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, वारकरी इत्यादी व्यक्तिरेखा त्या – त्या पोशाखात साकारल्या. त्यातही आपल्या बोबड्या भक्तीपूर्ण आवाजात त्यांनी त्यांचे विचार आणि विठ्ठलाप्रति श्रद्धा व्यक्त केली. दिंडीमध्ये विठुरायाचा गजर आणि टाळ- चिपळ्यांचा निनाद अधिकच वातावरण निर्मिती करत होता. छोट्या वारकऱ्यांचे पाऊल नृत्य, अचंबित करणारे होते. पावसाची तमा न बाळगता, अखेर दिंडी विठ्ठल- रखुमाई मंदिरात प्रवेशली. आणि जयघोषाला एकच उधाण आले.युगे अठ्ठावीस उभा– पांडुरंगा तू विटेवरी — देवा बस ना जरा तरी — तन्मय गोसावी याने गायलेल्या या भक्ती गीताने सगळ्यां कडून वाहवा मिळविली. टाळनृत्य, फुगड्या, अभंग -भक्ती गीत गायन, आरती, पसायदान यामुळे सर्वच मंत्रमुग्ध होऊन गेले. गटनेते संजय आग्रे यांनी प्रसादाचे वाटप केले.यावेळी फोंडा केंद्रशाळा नंबर एक च्या मुख्याध्यापिका सृष्टी गुरव, सहशिक्षका रंजना पाटील, वेदांती नारक,र शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष- सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.