वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सचिन रावराणे यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी डॉ. नामदेव गवळी, खजिनदारपदी सौ.स्नेहल रावराणे यांची निवड जाहीर झाली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी महालक्ष्मी हॉटेल सभागृह येथे रोटरीचे गव्हर्नर प्रतिनिधी विक्रांतसिंह कदम, असिस्टंट गव्हर्नर प्रशांत कोलते यांच्या उपस्थितीत पार पडला.
येथील रोटरी क्लबच्या कार्यकारणीची मुदत ३० जूनला संपली. त्यानंतर सन २०२५- २६ करिता नवीन कार्यकारिणी करण्यात आली. यावेळी रोटरीयन प्रशांत गुळेकर, राजेश घाटवळ, प्रणय तेली, संतोष टक्के, संजय रावराणे, महेश संसारे, मंगेश कदम, प्रशांत कुळये, मुकुंद रावराणे, सुनील रावराणे, विद्याधर सावंत तसेच जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. वैभववाडी रोटरीचे नवीन सदस्य संदीप मोरे, दिनकर केळकर व उदयसिंह रावराणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गजानन कोलते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निहाल रावराणे आणि आर्य मोरे या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विक्रांतसिंह कदम म्हणाले, वैभववाडी रोटरी क्लबचे काम जबाबदारीने सुरू आहे. जीवनात प्रत्येकाला रोटरीच दिशा दाखवू शकते, रोटरीला दिलेले दान हे फुकट जाणार नाही हे सत्य आहे. त्याचबरोबर रोटरी मार्फत करण्यात येणारे दान हे सात्विक असले पाहिजे.
डॉ. प्रशांत कोलते म्हणाले, रोटरी ही सामाजिक संघटना आहे. रोटरीचे काम जगभर चालू आहे. जवळपास ३६ हजार क्लब रोटरीचे आहेत. पोलिओ निर्मूलनाच्या कामात रोटरीचे फार मोठे योगदान आहे. उद्दिष्ट ठेवून रोटरी काम करत असते. सामाजिक काम सुरू असताना रोटरीचे मेंबर देखील वाढले पाहिजे. रोटरीचा पाया मजबूत करण्याची जबाबदारी ही सर्व रोटरीयनची आहे असे सांगितले. मावळते अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी वर्षभरात रोटरीच्या माध्यमातून केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा दिला. यावेळी डॉ .विद्याधर तायशेटे, सचिन रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर सावंत यांनी तर आभार डॉ.नामदेव गवळी यांनी मानले.












