वैभववाडी (प्रतिनिधी) : नापणे धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षिते संबंधी बांधकाम विभागाने केलेल्या सूचनाचे पालण करून आनंद लुटावा. नव्याने उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलावर जाताना खबरदारी म्हणून देण्यात आलेल्या सूचनाचे पालन करावे. असे आवाहन वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. धबधब्यावरील नव्याने बांधलेला काचेचा पूल पर्यटकांचे आकर्षण ठरत असून धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.यावेळी तहसीलदार पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, सार्वजनिक बांधकामचे उपभियंता श्री. जोशी, उपस्थित होते. यावेळी धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अधिकारी स्तरावर चर्चा करण्यात आली. धबधब्यावर किमान शनिवार-रविवारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन त्या ठिकाणी पोलीस तैनात, होमगार्ड तैनात ठेवणे बाबत चर्चा करण्यात आली. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलावर जाण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. तसा फलक तिथे लावण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या सूचना पुढील प्रमाणे आहेत. 1) काचेच्या पुलासाठी प्रवेश मर्यादा-25 व्यक्तीसाठी मात्र. (एकावेळी पुलावर फक्त 25 जणांनी प्रवेश करावा) 2) पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. 3) काचेच्या पुलावरून चालताना सावकाश चालावे, शक्यतो बाजूच्या रेलिंग चा आधार घेऊन चालावे. 4) काचेच्या पुलाच्या बाजूच्या रेलिंग वर उभे राहू नये, खाली फार वाकून पाहू नये. 5) लहान मुलांना एकटे पुलावर सोडू नये, त्यांच्यासोबत जबाबदार व्यक्तीनी थांबावे. 6) पुलावर बसून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये. 7) काचेला धोका होईल असे कोणतेही अवजड वस्तू घेऊन पुलावर चढू नये. 8) पुलावर उड्या मारू नये, गोल पाईपला पकडून लोंबकळू नये. 9) परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. 10) आनंदा सोबत शिस्त बाळगावी, सहकार्य करावे. वरील सूचनांचे काटेकोर पालन करावे व तसे न आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.अशी सूचना करण्यात आली आहे.
नापणे धबधब्यावर आनंद घेताना पर्यटकांनी खबरदारी म्हणून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे… तहसीलदार सूर्यकांत पाटील












