उशिराने कार्यालयात दाखल असल्याने दिली हाेती नाेटीस
ओरोस (प्रतिनिधी) : दोन वेळा नोटिसा देवूनही सुधारणा न झालेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सोमवारी मोठा दणका दिला आहे. तब्बल ६८ लेट लतिफाना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, ही शेवटची नोटीस असून यापुढे उशिराने कार्यालयात दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे खेबुडकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद कर्मचारी उशिराने दाखल होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी यापूर्वी दोन वेळा नोटिसा बजावल्या होत्या. पहिल्या वेळी दोघांना तर दुसऱ्या वेळी सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र, तरीही कर्मचारी वेळेत येत नसल्याचे सोमवारी खेबुडकर यांच्या निदर्शनास आले. सोमवारी कार्यालयांना दिलेल्या भेटीत तब्बल ६८ कर्मचारी उशिराने कार्यालयात दाखल झालेले दिसले. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.












