अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : विवाहित महिला घरामध्ये एकटी असल्याचे पाहून मीटर रिडींग घेण्याचा बहाणा करून महिलेचा विनयभंग करणारा आरोपी सूर्यकांत अनंत चव्हाण ( वय 36 राहणार खरयेवाडी ओरोस) याला कणकवली न्यायालयाने 7सप्टेंबर 2018 रोजी सुनावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम केली आहे. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी याकामी सरकार पक्षाच्या वतीने यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी सूर्यकांत चव्हाण याला भादवि कलम 354,451, 323 च्या गुन्ह्यात दोषी धरून प्रत्येक कलमाखाली एक वर्ष सश्रम करावास व एकूण पाच हजार रुपये नुकसान भरपाई अशी शिक्षा कणकवली न्यायालयाने सुनावली होती. त्या शिक्षेच्या विरुद्ध आरोपी सूर्यकांत चव्हाण याने सिंधुदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर अपिलाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश २ व्ही. एस. देशमुख यांच्यासमोर होऊन कणकवली न्यायालयाने आरोपीला दिलेली शिक्षा कशी योग्य आहे व आरोपी कसा दोषी आहे ही बाब सरकारतर्फे युक्तिवादात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी न्यायालय समोर परखडपणे मांडली. जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी आरोपीला कणकवली न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवून आरोपीचे अपील फेटाळून लावले. आरोपीला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देऊन आरोपीची रवानगी शिक्षा भोगणे करता कारागृहामध्ये करण्यात आली. कणकवली न्यायालयात सुद्धा सरकार पक्षाच्या वतीने ऍड.गजानन तोडकरी यांनीच युक्तिवाद केला होता.












