मंदार शिरसाट यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ नगर पंचायतच्या सात नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी स्वेच्छेने आघाडीचा गट सोडला आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता कायद्यानुसार अपात्र करावे, अशी मागणी महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक झाल्यावर शिवसेनेचे ७ आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक मिळून ९ जणांनी कुडाळ महाविकास आघाडी या नावाने गट स्थापन केला. त्याला ११ फेब्रुवारी २०२२ ला राजपत्रामध्ये मान्यता देण्यात आली. या गटामध्ये गटनेता म्हणून मंदार शिरसाट तसेच किरण शिंदे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, आफरीन करोल, अक्षता खटावकर या होत्या. दरम्यान यापैकी सात जणांनी १३ फेब्रुवारी २०२५ ला ओरोस येथे भाजप पक्षात प्रवेश केला. तसेच त्यानंतर त्यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन ‘विकासासाठी आम्ही भाजपात प्रवेश केल्याचे’ प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. ठाकरे शिवसेना व काँग्रेसच्या या सात नगरसेवकांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश हा स्वेच्छेने होता. त्यासाठी श्री. शिरसाट यांनी वर्तमानपत्रात आलेल्या भाजप प्रवेशाच्या बातम्या, त्या सात नगरसेवकांनी प्रवेशानंतर घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याच्या बातम्या तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभेच्छांचे शहारत लावलेल्या बॅनरचे फोटो असे पुरावे जोडलेले आहेत.
दरम्यान उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आपल्या लेटरहेडवर सभेचे निमंत्रण देऊन गटनेता बदलण्यासंदर्भात विषय ठेवला होता. मात्र या सात जणांनी स्वेच्छेने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते या गटामध्ये नसताना सभेचे निमंत्रण दिले. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता कायदा प्रमाणे किरण शिंदे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, आफरीन करोल, अक्षता खटावकर या सात नगरसेवकांना अपात्र करावे अशी मागणी घटनेता मंदार शिरसाट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.












