कॅन्सरग्रस्त रुग्णाला जीवनदान; राणे कुटुंबीयांचे सहकार्य!

भाजप कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेखर चव्हाण यांचे मोफत उपचार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील रहिवासी शेखर जनार्दन चव्हाण (वय ५१) तोंडाच्या कॅन्सरने आजारी होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुमारे साडे चार लाख रुपये एवढा मोठा खर्च आला. या उपचारासाठी लागणारी सर्व आर्थिक मदत धर्मादायकडून मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व उत्तर पश्चिम मुंबई भाजप जिल्हा सचिव नामदेव चव्हाण यांनी प्रयत्न केले. सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सरग्रस्त रुग्ण शेखर चव्हाण यांचा ऑपरेशनचा सर्व खर्च मोफत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून रुग्ण शेखर चव्हाण आता आजारातून ते पूर्णतः बरे झाले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांचे यात सहकार्य लाभले. त्यांच्याच सहकार्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्ण शेखर चव्हाण यांच्यासाठी मुंबई येथील नामांकित नानावटी रुग्णालयात उपचाराकरिता धर्मादायकडून मदत मिळवून दिल्याचे भाजप कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांनी सांगितले. तसेच कोकणासह महाराष्ट्र राज्यातील कोणताही व्यक्ती गंभीर आजाराने आजारी असल्यास त्याला देखील आपण अशाच प्रकारे मदत मिळवून देणार असल्याचे देखील नामदेव चव्हाण यांनी सांगितले.

कॅन्सरग्रस्त रुग्ण शेखर चव्हाण यांनी खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे आभार मानले असून त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने डॉक्टरांचा खर्च परवडणारा नव्हता. अशावेळी तत्परता दाखवून उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली. ती मी कधीच विसरू शकत नाही. नामदेव चव्हाण यांच्यामुळे मी माझे नवीन आयुष्य जगू शकलो, अशी प्रतिक्रिया कॅन्सरग्रस्त रुग्ण शेखर चव्हाण यांनी दिली.

error: Content is protected !!