सावंतवाडी पोलिसांची चपळ कामगिरी; चोरीची रिक्षा २४ तासांत परत!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथे चोरी झालेली रिक्षा २४ तासाच्या आत इचलकरंजी येथून हस्तगत केल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी इचलकरंजी येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. माडखोल-धवडकी येथील गणपत कोरगावकर यांची तीन आसनी रिक्षा चोरी झाली होती. त्याप्रकरणी महम्मद रफीक सलिम मुल्लाव (वय ३९) व संजय भोपाल पवार (वय २५) दोघे राहणार खोतवाडी- इचलकरंजी अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या दोघा चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

१६ जुलैला रात्री १ ते सकाळी ६ च्या दरम्यान माडखोल-धवडकी येथील गणपत कोरगावकर यांच्या घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी कोरगावकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वाहन चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मिळालेल्या गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या तपासानुसार पोलिसांनी दोघांना इचलकरंजी येथे ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरी केलेली रिक्षा त्यांच्या ताब्यातून २४ तासांच्या आत हस्तगत केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हवालदार दीपक शिंदे, गलोले आणि पोलीस नाईक मनीष शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

error: Content is protected !!