कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करत प्रशालेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेमध्ये पूर्व उच्च प्राथमिक विभागात मानस पिळणकर ८० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात ११ वा, कृष्णा बडांगळे ७५ टक्के गुणांसह जिल्हयात २१ वा, विजय चव्हाण ६४ टक्के गुणांसह जिल्ह्यात ५७ वा आला असून या तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. परीक्षेसाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिल डेगवेकर, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक ए. व्ही. वनवे तसेच विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवलीच्या मुख्याध्यापिका दिव्या सावंत, पर्यवेक्षिका श्रुती बावकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.












