प्रशालेचे संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांची नाविन्यपूर्ण संकल्पना
कणकवली (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खारेपाटण येथे शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयामध्ये एक अनोखा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. इयत्ता पहिली ते दहावीच्या पाठ्यक्रमातील मराठी आणि हिंदी विषयांच्या कवितांवर आधारित गायन, नृत्य, कविता अभिवाचन आणि एकपात्री अभिनय असा पंचसूत्री कलाविष्कार यांचा संगम असलेला ‘स्वर पौर्णिमा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदिप पेंडूरकर यांची नाविन्यपूर्ण संकल्पना व दर्जेदार संगीत संयोजन यामुळे या कार्यक्रमाला चारचांद लागले. गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून प्राजक्ता ठाकूर-देसाई हिने या कार्यक्रमाची सुरुवात केली. गुरुमहिमा व्यक्त करणारे सुंदर नृत्य इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आयुषी गुरव, दिबा ठाकूर, दिक्षा कर्ले व आराध्य पराडकर यांनी सादर केले. त्यानंतर ‘धरिला पंढरीचा चोर’ हे गीत तेजल ठाकूर-देसाई हिने सादर केले. तर ‘देवा मला शाळेत जायचं हाय’ या गीतावर नृत्य तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. आठवीची भावस्पर्शी हिंदी कविता’ छुप छुप अश्रू बहानेवालो’ प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने सादर केले. यानंतर बालकवींची श्रावणमासाचे महत्त्व विषद करणारी ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही प्रसिद्ध कविता आयुषी गुरव हिने पाठांतर व अभिनययुक्त सादर करून रसिकांची मने जिंकली.

पाचवीच्या अभ्यासक्रमातील ‘माय मराठी’ या कवितेवर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य केले. ‘हंबरून वासराले चाटती जव्हा गाय…’ ही मातेच्या प्रत्येक रूपाची ओळख करून देणाऱ्या कवितेचे गायन इयत्ता सहावीच्या मुलींनी केले. संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांनी गझलच्या लहेज्यामध्ये संगीतबद्ध केलेली व स्वतः गायन केलेली आठवी हिंदी पुस्तकातील ‘चारू चंद्र की चंचल किरणें, खेल रही हैं जल थाल में…’ या कवितेने कार्यक्रमाची उंची वाढविली. प्रशालेचा सातवीतील विद्यार्थी गुरुप्रसाद सुतार याने सुंदर असे पखवाज वादन केले. प्राथमिक विभागातील पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘चिऊताई चिऊताई’ या बालकवितेवर मनमोहक नृत्य सादर केले.
पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे, जीवनदायी आहे आणि त्याचं जतन करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेला हाक देणारी सातवी मराठी विषयाची भावोत्कट कविता दिबा ठाकूर हिने सादर केली. कोकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याची आणि एका नवविवाहितेच्या माहेरवाटेच्या ओढीची दहावी मराठी विषयाची भावस्पर्शी कविता अनुक्षा पतयाण हिने सादर केली. ‘माझ्या घोवाला कोकण दाखवा’ ही कविता केवळ निसर्गाचं वर्णन नाही, तर ती आहे माहेरच्या ओढीची आणि ममतेच्या नात्यांची गोड गाथा. तीही सादर करण्यात आली. ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या दहावी मराठीच्या कवितेवर प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने केलेल्या एकपात्री अभिनयाने रसिकांना अंतर्मुख केले. दहावी मराठी विषयातील ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ ही कविता सानिया पवार हिने सादर केली. दहावी मराठी पुस्तकातील ‘जय जय भारत देशा’ या कवितेवर राधा ठाकूरदेसाई हिने देशभक्तीने ओतप्रोत भरलेले नृत्य सादर केले. याच भावनेवर आधारित ‘अनामवीरा इथे जाहला तुझा जीवनांत’ हे गीत प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने सादर करून देशाच्या सैनिकांना मानवंदना दिली. प्रशालेचे शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण यांनी एक सुमधुर गीत गायन केले. कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांनी सहावीतील मराठी कविता ‘बलसागर भारत होवो’ ही भैरवी रागामध्ये गायन करून केली.

या कार्यक्रमास श्रीधर पाचंगे, मंथन चव्हाण, आयुष मांगले, लक्ष्मीकांत हरयाण यांनी संगीत साथ केली. पूनम गुरव, शार्मीन काझी व प्राथमिक विभागातील शिक्षिकांचे नृत्य दिग्दर्शन लाभले. संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व संस्था संचालक, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि खारेपाटण पंचक्रोशीतील रसिकांनी या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे खूप कौतुक केले.












