चौके (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊन नियोजनबद्ध अभ्यास केल्यास कोणत्याही परीक्षेत यश मिळवून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता येतो, असे प्रतिपादन तिमिरातुनी तेजाकडे या संस्थेचे संचालक सत्यवान रेडकर यांनी केले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाच्या करिअर कट्टा विभागाच्या वतीने व कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी सुरू केलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या उपक्रमांतर्गत गुरुदक्षिणा हॉल कट्टा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे संचालक महेश वाईरकर यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांचा संस्था सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व वृक्ष देऊन प्रथमत: सन्मान करण्यात आला. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टाचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश वाईरकर, मिठबावकर असोसिएटचे संचालक ॲड. प्रदिप मिठबावकर, विमा प्रतिनिधी अजय मयेकर, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्गचे जगन चव्हाण, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टाचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य प्रा. रविंद्र गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपप्राचार्य प्रा. रविंद्र गावडे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी सत्यवान रेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, तसेच बँकिंग, आर्मी, एसआरपीफ, सीआरपीएफ व इतर स्पर्धा परीक्षा, यांचा अभ्यासक्रम, मुलाखत, निवडपद्धती, अभ्यासपद्धती, याची सखोल माहिती दिली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी स्पर्धा परीक्षा केवळ ज्ञानच नव्हे तर तर्कशक्ती बुद्धिमत्ता आणि मानसिक तयारी यांची देखील कसोटी घेतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या परीक्षांचा मोठा फायदा होतो, असे सांगितले. यावेळी मिठबावकर असोसिएट कट्टाचे संस्थापक ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या मार्गदर्शन शिबीराला कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित तिन्ही युनिटचे एकूण १७५ विद्यार्थी, तिन्ही यूनिटचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा. श्रुती कुंभार यांनी केले. तर आभार प्रदर्शन करिअर कट्टा सहाय्यक प्रा. कांचन खानोलकर यांनी केले.












