वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे वाढदिवसानिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील करंजे या गावातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शरदचंद्रजी रावराणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते हे सर्व साहित्य या प्रशालेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांना सुपूर्द करण्यात आले मा. तावडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या प्रशालेला आवळा, आंबा व जाम या फळझाडांचे वाटप व वृक्षारोपणही करण्यात आले. या प्रशालेला आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यामागचा उद्देश आपल्या मनोगतात डॉ.गवळी यांनी व्यक्त केला. विश्वस्त श्री.शरदचंद्रजी रावराणे यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद विद्यालय, करंजे या प्रशालेतील सर्व विद्यार्थी, कर्मचारी व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीमती सोगम यांनी सर्वांचे स्वागत केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रशालेचे अधीक्षक श्री. कदम यांनी व्यक्त केले.
विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप










