कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ ता-निपाणी यांच्या वतीने देण्यात आला पुरस्कार
वैभववाडी (प्रतिनिधी) : कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ ता-निपाणी जि-बेळगावी यांच्या वतीने ५ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दि.२० जुलै २०२५ रोजी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह बेडकिहाळ येथे संपन्न झाले. यावेळी शैक्षणिक, साहित्य, कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार २०२५ च्या पार्श्वभूमीवर पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी चे क्रीडा शिक्षक संदेश तात्या तुळसणकर यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन या कार्यक्रमात मानाचा फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट चे डॉ. विक्रम शिंगाडे, बेळगावीचे निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाष होसकल्ले, इस्लामपूरचे संत साहित्याचे चिकित्सक राजा माळगी, पांडुरंग पाटील, मारूती पाटील, प्रकाश कदम, ज्योती आदाटे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
या पुरस्काराबद्दल वाभवे – वैभववाडी नगरपंचायत चे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत प्रशालेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर, एस. बी. शिंदे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.












