ग्रामस्थांना जागृक राहाण्याचे ग्रामपंचायत उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांचे आवाहन
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत हद्दीत घरात कुणी नसताना महावितरण वा महावितरणच्या ठेकेदाराचे कर्मचारी अनधिकृतपणे घरगुती मीटर बदलत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत महावितरणचे आचरा येथील सहाय्यक अभियंता सौरभ वर्मा यांना आज चिंदर ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी लेखी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, चिंदर ग्रामपंचायत हद्दीत महावितरण कडून स्मार्ट मीटर वा इलेक्ट्रीक मीटर बदलण्यात येत असतील तर चिंदर ग्रामपंचायतला माहिती देऊन संबंधित ग्राहक यांच्या परवानगीनेच आवश्यकता भासल्यास मीटर बदलण्यात यावा. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना या निवेदना बाबत कल्पना देण्यात यावी. यावेळी सहाय्यक अभियंता सौरभ वर्मा व उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांच्या मध्ये स्मार्ट मीटर तसेच चिंदर गावातील विज समस्यांन बाबतीतही सखोल सकारात्मक चर्चा झाली.
महावितरणद्वारे गावात आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या स्मार्टमीटर/इलेक्ट्रिक मीटर बसवण्याबाबत ग्रामस्थांच्या मनात अनेक साशंकता आहेत. चिंदर गावातील काही भागात सरसकट मीटर बदलण्यात आले आहेत. याबाबत महावितरणकडून संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. कोणताही शासकीय आदेश नाही, मीटरधारकांची कोणतीही परवानगी नाही.असे असताना घराच्या भिंतीवर बेकायदेशीररित्या मीटर बदलून लावले आहेत.
महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी आदेश न देता अगदी घरात कोणी नसतानाही जुने मीटर काढून नवीन मीटर बसवत आहेत. जेव्हा ग्राहकाला त्याचा विद्यमान मीटर सदोष वाटतो तेव्हा त्याला तो बदलण्यासाठी महावितरणाकडे अर्ज करून शुल्क भरावे लागते. त्याचप्रमाणे, महावितरणला स्वतःहून मीटर बदलायचा असेल तर ग्राहकांना शासनाच्या निर्णयाची माहिती देऊन रितसर नोटीस देणे बंधनकारक आहे. तसे न करता परस्पर मीटर बदलले जात आहेत.
जुने मीटर काढून नवीन मीटर बसवताना जुन्या मीटरमधील अंतिम रीडिंग ग्राहकाला दाखवले जात नाही. नवीन बसवलेल्या मीटरमधील शून्य रीडिंग दाखवले जात नाही. जेव्हा मीटर रीडिंग घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा कर्मचारी घर बंद असल्यास, गेट बंद असल्यास किंवा कुलूप असल्यास रीडिंग घेत नाहीत आणि सरासरी बिल पाठवतात; मात्र मीटर बदलण्यासाठी ग्राहक घरी नसतानाही मीटर बदलले आहेत.याबाबत गावातील ग्रामस्थांनी जागृक राहण्याचे आवाहन उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी ग्रामपंचायत च्यावतीने केले आहे.











