चौके ( प्रतिनिधी ) : सलग १० वर्षे श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा कायम राखून यशस्वी विजय पताका रोवलेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या यशात सहभागी त्यांचे आई – वडील पालक, आणि शिक्षक या सर्वांच्या योगदानामुळे हे यश मिळविणे शक्य झाले आहे. भविष्यात ही परंपरा पुढचे विद्यार्थी कायम राखतील अशी खात्री आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थाचालक म्हणून आम्ही सदैव आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. त्यांच्या साठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या आम्ही करत आहोत. संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार सुनील प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण शाळेला संस्थेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ” असे प्रतिपादन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी यांनी काळसे हायस्कुलमध्ये दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ काळसे संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्वर्गीय जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय काळसे या प्रशालेच्या सन २०२४-२५ च्या १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक २६ जुलै रोजी श्री शिवाजी विद्यामंदिर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी जयवंती बापू फाउंडेशन संचलित MITM इंजीनिअरिंग कॉलेज ओरोसचे विश्वस्त विनोद कदम, तसेच नॉन कमिशन ऑफिसर हवालदार इन्फंट्री रेजिमेंट संतोष भटकर, ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग चे हवालदार राकेश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष योगेश राऊळ सचिव अनंत परब, सहसचिव शरद गोसावी, संचालक दाजी परब, शिवनंदन प्रभू, उमेश प्रभू, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, माजी सैनिक विजय प्रभू, माजी विद्यार्थी सेवा संस्था संस्थापक चंद्रकांत दळवी, मुख्याध्यापक अविनाश परब, माजी सचिव केशव सावंत, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र परब, सामाजिक कार्यकर्ते रमेश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर प्रशालेतील दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने रोख पारितोषिके आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी प्रशालेचे शिक्षक शंकर अशोक काळसेकर यांना आदर्श शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्राजक्ता तुकाराम परब यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. आणि प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी मुक्ता शरदचंद्र काळसेकर हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा – ७९.३३% गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक प्राप्त केल्या बद्दल तिचा आणि या सोहळ्याला उपस्थित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय दत्ताराम परब यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच प्रशालेच्या सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणा-या व उत्कृष्ट सूत्र संचालन करणा-या शिक्षिका नेहा माईणकर यांनाही सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. दरम्यान प्रमुख अतिथी विनोद कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कीं, भविष्यात कौशल्य विकासाची गंगा प्रत्येक गावात जाऊन कोकणातील घराघरातला माणूस हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे कोकणातील शेतकरी हा उद्या जगावर राज्य करणारे शेतकरी म्हणून नावाजला गेला पाहिजे म्हणूनच शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य पूर्ण बनवणे ही आमची संकल्पना आहे. तसेच इन्फंट्री रेजिमेंट हवालदार संतोष भटकर यांनी कारगिल शौर्य दिनानिमित्त कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना NCC या विषयावर मार्गदर्शन केले आणि एवढ्या ग्रामीण भागातही सुसज्ज शाळा उभारल्याबद्दल संस्थाचालकांचे अभिनंदन केले.














