माती, माणसं आणि आठवणी यांना जिवंत करणारा यूट्यूबर हरपला!

‘रेड सॉइल स्टोरीज’चे शिरीष गवस यांचे निधन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कोकणातील ग्रामीण संस्कृती आणि खाद्यपरंपरेचा यूट्यूबच्या माध्यमातून प्रचार-प्रसार करणारे ‘रेड सॉइल स्टोरीज’चे निर्माते शिरीष गवस (वय ३३) यांचे १ ऑगस्ट रोजी, दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मेंदूच्या आजाराने ग्रस्त असलेल्या शिरीष यांच्यावर गोव्यात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही वर्षांत शिरीष गवस यांनी कोकणातील पारंपरिक अन्नसंस्कृती, सण-उत्सव, शेती, गावं आणि माणसं यांचे दर्शन ‘रेड सॉइल स्टोरीज’ यूट्यूब चॅनेलद्वारे जगासमोर मांडले. त्यांच्या साध्या, पण जिव्हाळ्याच्या शैलीतून सादर केलेले व्हिडिओ लाखो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत होते.

शिरीष गवस यांचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते. शिरीष यांनी एमबीएची पदवी मिळवली होती आणि मुंबईतील नामांकित खाजगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली होती. तर त्यांची पत्नी पूजा ही ‘FTI पुणे’ येथून प्रॉडक्शन डिझाईन शिकलेली आणि बॉलिवूडमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होती. बॉलिवूड चित्रपटसृष्टीत सात वर्षे आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांनी कार्य केले. कोरोना काळात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मुंबईतील नोकरी सोडून कोकणात स्थलांतर केले. कोकणात आल्यानंतर दोघांनी मिळून स्वयंपाक, शेती, निसर्ग आणि गावकऱ्यांच्या आठवणी यांची उजळणी त्यांच्या व्हिडिओंमधून केली.

वर्षभरापूर्वीच ते एका मुलीचे बाबा झाले होते. आज त्यांच्या अकाली जाण्याने गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाट्ये पुनर्वसन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोशल मीडियावर शिरीष गवस यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त होत असून, कोकणच्या मातीतून उगम पावलेला एक सच्चा कथाकार आज काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!