आजच्या अविचारी उन्मादी काळात लोकशाहीधिष्टित परिवर्तनाची गरज- डाॅ.महेश केळुसकर

सम्यक साहित्य संसदेचा ‘कविता वर्षावासाच्या कविता परिवर्तनाच्या’ अनोखा कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आंबेडकरी कवितेचा वर्तमान आव्हानात्मक असून आजच्या अविचारी उन्मादी काळात लोकशाहीधिष्टित परिवर्तनाची अधिकच गरज आहे. आंबेडकरवाद वर्तमान कालखंडामध्ये महत्वाचा जागतिक विचारवारसा म्हणून मान्यता पावत आहे. आंबेडकरवादी असण्यासाठी कोणत्याही जात, धर्म किंवा पंथाचा असणे आवश्यक नाही, भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या बाजूने उभा असणारा प्रत्येक माणूस आंबेडकरवादाचा व पर्यायाने भारतीय संविधानाचा समर्थक ठरतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, कादंबरीकार डाॅ.महेश केळुसकर यांनी केले. सम्यक साहित्य संसद आयोजित ‘कविता वर्षावासाच्या कविता परिवर्तनाच्या’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

मराठी साहित्यातील निवडक कवींच्या कवितांचे अभिवाचन आणि पाऊसगाण्यांचे सुश्राव्य गायन तसेच निमंत्रित कवींचे काव्यवाचन अशा ‘कविता वर्षावासाच्या कविता परिवर्तनाच्या’ या त्रिस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन सम्यक साहित्य संसद या संस्थेच्या वतीने येथील एच.पी.सी.एल. सभागृहात करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री.केळुसकर पुढे म्हणाले की, सम्यक साहित्य संसद ही संस्था गेली अनेक वर्ष साहित्यिक, वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवत आली असून ती सर्व सामाजिक समुहाला जोडून घेत महाराष्ट्राच्या विविध स्तरांवर व्यापकपणे कार्यरत आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत एक अग्रगण्य साहित्यिक संस्था म्हणून निश्चितच अभिमान आहे.

यावेळी काव्यपीठावर संस्थेचे अध्यक्ष इंजि.अनिल जाधव, प्रमुख अतिथी कादंबरीकार आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी प्रा.प्रवीण बांदेकर, सूत्रनिवेदक तथा संस्थेचे कार्यवाह राजेश कदम, मराठी साहित्य, संस्कृती मंडळाचे सदस्य कवी विठ्ठल कदम, कवी प्राचार्य सिद्धार्थ तांबे, कवी व इतिहास संशोधक सुनिल हेतकर, प्रा. डाॅ.राजेंद्र मुंबरकर, कवयित्री संध्या तांबे, कवी अरूण नाईक, मधुकर मातोंडकर आदी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा.प्रवीण बांदेकर बोलताना म्हणाले की, सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीत अनेक कवींनी परिवर्तनाचा आदर्श उभा केला. यामध्ये आ.सो.शेवरे आणि समकालीन कवी, लेखकांचे योगदान विसरून चालणार नाही. सम्यक साहित्य अक्षरपीठ स्थापन करून आबांनी नवोदितांच्या आंतरिक उर्मींना प्रोत्साहन दिले. लेखनाची उर्जा दिली, असे सांगून श्री.बांदेकर यांनी सम्यक साहित्य संसदेच्या साहित्यिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सम्यक साहित्य संसदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी कवी आ. सो. शेवरे यांच्या कवितांवर डाॅ.श्रीधर पवार आणि अभय शेवरे यांनी संपादित केलेले ‘आ.सो.शेवरे : समग्र कविता’ या पुस्तकाचे तसेच सुनिल कांबळे (हेतकर) यांच्या ‘शिलालेख’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ.महेश केळुसकर व प्रा.प्रवीण बांदेकर आदी साहित्यिकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी मराठी साहित्यातील निवडक कवींच्या कवितांचे अभिवाचन व मराठीतील प्रसिद्ध पाऊसगाण्यांची संगीतमय मैफल आणि निमंत्रित कवींचे काव्यवाचन अर्थात “सामाजिक परिवर्तनाचा आशयघन आविष्कार” ही टॅगलाईन घेऊन अत्यंत नीटनेटका आणि प्रभावी कार्यक्रम संपन्न झाला. तथागत गौतम बुद्ध आपल्या प्रवचन काळात वर्षाऋतूत आपल्या भिक्खूंसमवेत जिथे मुक्काम करत तिथे विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी वर्षावासाच्या माध्यमातून ते संदेश देत असत. याच बुद्धकालीन विचारधारेचे सूत्र घेवून कवी राजेश कदम, सिद्धार्थ तांबे यांच्या निर्मिती संकल्पनेवर आधारित विठ्ठल कदम, संध्या तांबे यांच्या सहकार्यातून साकार झालेल्या या कार्यक्रमाला रसिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी लोककलावंत प्रा.हरिभाऊ भिसे, कवी प्रा.मोहन कुंभार, पत्रकार विजय शेट्टी, सिंपन प्रतिष्ठानचे अनिल तांबे, श्याम सावंत, आकाश तांबे, सूर्यकांत कदम, विद्याधर कदम, गोपी पवार, सुदिप तांबे, दर्पण प्रबोधिनी सचिव सुनिल तांबे, श्रीधर तांबे, महेंद्र कदम, संदेश कदम, प्रज्ञा कदम, स्नेहल तांबे, सामाजिक कार्यकर्ते विद्याधर कदम, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुरेखा महाजन, श्री.जोशी, मधुकर जाधव आदी विविध चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्ते आणि रसिक श्रोते उपस्थित होते.

यावेळी झालेल्या काव्य अभिवाचनाचा कार्यक्रमात सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते अभय खडपकर, नाट्यकर्मी राजेंद्र कदम, अभिनेते व गायक सुदिन तांबे, शैलेश तांबे, संवादक श्रेयश शिंदे, विद्याधर तांबे, प्रा.सीमा हडकर, प्रा. सुषमा हरकुळकर, अनुष्का तांबे, मयुरी पेडणेकर, सुनील जाधव, आर्या कदम, सिद्धी परब आदी नाट्यकलावंत आणि संवादक यांनी मराठीतील निवडक कवींच्या पाऊस आशयावरील कवितांचे अर्थवाही अभिवाचन केले. तसेच या कार्यक्रमात पाऊसगाण्यांची संगीतमय मैफल सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. यामध्ये गायक महेश काणेकर, संगीत संयोजक संदेश रावले, अमृता घाडी, राजेश वाळके, राकेश मिठबावकर, संदेश तांबे यांनी सुमधूर पाऊसगाण्यांचा वर्षाव केला.

निमंत्रितांच्या काव्यवाचनात मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य कवी विठ्ठल कदम, सुनील कांबळे, अरुण नाईक, सिद्धार्थ तांबे, प्रा.मोहन कुंभार, संध्या तांबे, प्रा. पूनम गायकवाड, स्नेहा कदम, प्रा. सुचिता गायकवाड, दीपक तळवडेकर यांनी काव्यवाचनामध्ये सहभाग नोंदवला. संस्थेचे अध्यक्ष इंजि.अनिल जाधव यांनी वर्षावासाचे बुद्धकालीन महत्व विशद करून आजच्या वैचारिक चळवळीत लोकशाहीधिष्टित साहित्यिक मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी सम्यक परिवर्तनाची गरज आहे. विचारांचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. या प्रामाणिक हेतूने आयोजित केलेल्या या अनोख्या कार्यक्रमाला त्यांनी सदिच्छा दिल्या.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आशयप्रधान सूत्रनिवेदन अभिनेते निलेश पवार यांनी केले तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. एकूणच हा कार्यक्रम अतिशय बहारदार व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला याबद्दल संस्थेच्या सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त करून भावी काळामध्ये अशा प्रकारचे अभिनव उपक्रम राबवून संस्थेचे समाजाभिमुख सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य वृद्धिंगत करण्याचे आश्वासन या निमित्ताने दिले. एकूणच कार्यक्रम अतिशय नेटका झाल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी केले.
शेवटी संस्थेचे कार्यवाह राजेश कदम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!