आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट…!

सार्वजनिक बांधकाम व हायवे प्राधिकरणाने खारेपाटण महामार्गावर साठलेले पाणी मार्गस्थ करून रस्ता केला मोकळा

खारेपाटण (प्रतिनिधी) : आज शुक्रवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर खारेपाटण संभाजीनगर येथे पावसाचे पाणी साचून महामार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या आशयाचे वृत्त ‘आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल’ च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व हायवे प्राधिकरण खात्याकडून खारेपाटण संभाजी नगर येथे राष्ट्रीय महामार्गावर साठलेल्या पावसाचे पाणी तत्काळ मार्गस्थ करून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस निर्धोक केला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील खारेपाटण संभाजी नगर येथे कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तसेच महामार्गाच्या बाजूला असलेले वहाळ, नाले व गटारे आणि मोरी पावसाळ्यापूर्वी साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी महामार्गावरच थांबले होते. त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या घटनेची माहिती आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल मार्फत प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बी. जी. कुमावत यांसह त्यांच्या कर्मचारी वर्गाने घटनास्थळी तातडीने भेट दिली. त्यानंतर युद्धपातळीवर काम सुरु करण्यात आले. जेसीबी व इतर साधनांच्या साहाय्याने महामार्गावरील साचलेले पाणी निचरा करून महामार्ग मोकळा करण्यात आला. याबाबत खारेपाटण ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!