कासार्डे पोलीस दूरक्षेत्रासह कणकवली पोलिसांची दमदार कामगिरी
भर पावसात कासार्डे आनंदनगर जंगलमय परिसरात धडक कारवाई
तळेरे (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सव काळात कासार्डे दूरक्षेत्र पोलिसांसह कणकवली पोलिसांनी दमदार कामगिरी करत 1 लाख 64 हजार रुपयांची गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा जप्त केला आहे. ही धडक कारवाई कासार्डे पोलीस दूरक्षेत्रासह कणकवली पोलिसांनी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कासार्डे आनंदनगर येथील माळरानावर केली. या गुन्ह्यात तेजस भांबुरे, सागर डंबे यांसह गुरू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम , डीवायएसपी घन:शाम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हवालदार पांडुरंग पांढरे, कासार्डे पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांच्या पथकाने केली. याबाबत अधिक माहिती अशी की कासार्डे आनंदनगर येथील जंगलमय माळरानावर गोवा बनावटीची अवैध दारू विक्री केली जात असल्याची खबर हवालदार झोरे यांच्यासह कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हवालदार चंद्रकांत झोरे, कॉन्स्टेबल जाधव यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक बर्गे, हवालदार पांढरे यांनी कासार्डे आनंदनगर येथील माळरानावर धडक शोधमोहीम राबवली. भर पावसात भांबुरे आणि डंबे यांच्या गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीचे हॉट स्पॉट शोधून हल्लाबोल केला. घटनास्थळी सापडलेला मुद्देमला जप्त करून आरोपी तेजस भांबुरे, सागर डंबे, गुरू पाटील यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई केली.












