कणकवली (प्रतिनिधी) : ओमकार साटम वेलफेअर ट्रस्टतर्फे ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत पांडुरंग साटम व सुनेत्रा साटम यांच्यातर्फे आयनल गावामधील एकूण ९० मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. आयनल मणेरवाडी येथे गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास ट्रस्टचे चंद्रकांत साटम, माजी चेअरमन भालचंद्र साटम, माजी सरपंच बापू फाटक, अदिती साटम, पोलीस पाटील दिपक चव्हाण, आनंद साटम, अमर सेवा मंडळाचे अध्यक्ष भगवान मसूरकर, सचिव सत्यवान पेडणेकर, रामचंद्र साटम, अण्णा वायंगणकर, मनोहर चव्हाण, शाखाप्रमुख अरुण साटम, आत्माराम साटम, प्राथमिक शिक्षक सावंत, आदेश ओटवकर, दत्तात्रय फाटक, उत्तम ओटवकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भालचंद्र साटम यांनी ओमकार चॅरीटेबल ट्रस्टबाबतची माहिती दिली. ट्रस्टने यापूर्वी आदीवासी व डोंगराळ भागातील शालेय मुलांना शैक्षणिक मदत केली असून ट्रस्टमार्फत काही मूली दत्तक घेवून त्यांचा पालन, पोषणाचा, शैक्षणिक व विवाहापर्यंतचा खर्च ट्रस्टने केलेला आहे. त्यामुळे ट्रस्टची कामगिरी निश्चित कौतुकास्पद आहे.
तर ओमकार ट्रस्टचे चंद्रकांत साटम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना मूलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेणे आवश्यक असून यापुढील काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गावातील मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी ओमकार ट्रस्टची संपर्क साधल्यास त्यांना योग्य ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेवटी शिक्षक सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.











